Planet News: तब्बल २४ वर्षांनी गुरु आणि शुक्र ग्रह 'या' वेळेत पाहता येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 07:47 PM2023-02-28T19:47:58+5:302023-02-28T19:48:20+5:30
अंतराळात पृथ्वी, शुक्र आणि गुरु हे तीन ग्रह जवळ जवळ एका रेषेमध्ये आल्यामुळे आपणास त्यांची युती झालेली पाहायला मिळते
पुणे : गेला महिनाभर सायंकाळच्या वेळी पश्चिम आकाशात तेजपुंज ग्रहगोलांच्या हालचालींचा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे. सूर्यमालेतील सर्वग्रहांत आकाराने प्रचंड मोठा आणि वजनदार ग्रह ज्याला वायुराक्षस (gas giant) असे संबोधले जाते, तो गुरु ग्रह पश्चिम क्षितिजाकडे हळूहळू सरकताना दिसतो आहे. तर सूर्यमालेतील सर्वात तप्त आणि तेजस्वी ज्याला सौंदर्याची देवता मानली जाते असा शुक्र ग्रह १ मार्च रोजी गुरूच्या अतिशय जवळ येणार आहे, अशी माहिती खगोल अभ्यासक शंकर शेलार यांनी दिली.
नभांगणातील या अलौकिक मनोहारी दृष्याचा 'परमोच्य देखणा नजारा' बुधवार दि. १ मार्च रोजी सायंकाळी पहायला मिळणार आहे. २ मार्च रोजीही पाहता येईल. त्यावेळी गुरु व शुक्र ग्रहांमध्ये युती होईल. शेलार म्हणाले, यावेळी त्यांच्यामधील अंतर केवळ ०.५२ डिग्री असेल. हा खगोलीय आविष्कार पाहण्यासाठी कोणत्याही उपकरणाची आवश्यकता नाही. सायंकाळी ६.३० ते ८.१५ या वेळेत आपल्या घराच्या गच्चीवरून, मैदानातून, उंच टेकडीवरून पाहता येईल. जेथून पश्चिम क्षितिज स्पष्ट दिसेल अशा कोणत्याही ठिकाणावरून पाहू शकता.’’
''जेंव्हा आकाशातील दोन पिंडांमध्ये युती घडते, तेंव्हा ते दोन पिंड दक्षिणोत्तर रेषेत एक दुसऱ्याच्या अत्यंत जवळ आलेले असतात. त्यांच्यातील पूर्व पश्चिम अंतर शून्य झालेले असते. सूर्यमालेतील सर्वच ग्रह विविध कक्षांमधून पण जवळपास एकाच प्रतलात सूर्याभोवती फिरत असतात. त्यामुळे अनेकदा ते एक दुसऱ्याच्या समोर आलेले दिसतात. - शंकर शेलार, खगोल अभ्यासक''
ग्रहमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा ग्रह शुक्र हा सूर्याभोवती सुमारे दहा कोटी किलोमीटर अंतरावरून फिरतो, तर गुरु हा पाचव्या क्रमांकाचा ग्रह सूर्यापासून सुमारे ७८ कोटी किलोमीटर अंतरावरून फिरत असतो. जवळपास २४ वर्षांतून एकदा अशी स्थिती येते की, हे दोन्ही ग्रहगोल एक दुसऱ्याच्या जवळ आलेले पृथ्वीवरून पाहायला मिळतात. प्रत्यक्षात मात्र त्यांच्यामध्ये कोट्यवधी किलोमीटरचे अंतर असते. अंतराळात पृथ्वी, शुक्र आणि गुरु हे तीन ग्रह जवळ जवळ एका रेषेमध्ये आल्यामुळे आपणास त्यांची युती झालेली पाहायला मिळते. गुरु आणि शुक्र या ग्रहांच्या बाबतीत असा योग सुमारे २४ वर्षांनी घडून येतो, असे शेलार म्हणाले.