कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य
By निलेश राऊत | Updated: June 15, 2023 16:35 IST2023-06-15T16:26:37+5:302023-06-15T16:35:23+5:30
राज्यातील सरकारमध्ये कुठलाही वाद नाही...

कलम ३७०, राम मंदिरानंतर आता आमचे लक्ष समान नागरिक कायद्यावर- केशवप्रसाद मौर्य
पुणे : ‘केंद्रात मोदी सरकार आल्यापासून आम्ही तीन कामांना प्राधान्य दिले. यात जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम हटविले, राममंदिर उभारणी केली व आता लक्ष हे देशात समान नागरिक कायदा करण्यावर आहे,’ अशी माहिती उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने मौर्य यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मौर्य म्हणाले, ‘भारत आज जगातील पाचवी अर्थव्यवस्था असून, हा गौरव मोदींच्या नेतृत्वाखाली मिळाला आहे. संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. मोदींच्या नेतृत्वात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे; परंतु, राहुल गांधी दुसऱ्या देशात जाऊन भारताची निंदा करीत आहेत. भारताची निंदा करण्यापेक्षा राहुल गांधी यांना आमचे आव्हान आहे की, आपल्या पक्षांसह आमच्या विचारधारेला विरोध करावा; पण २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी हटविण्यासाठी काँग्रेसकडे एकही मुद्दा नाही. सन २०२४ च्या निवडणुकीसाठी भाजप कामाला लागले असून, उत्तरप्रदेशमधून ७५ पेक्षा जास्त जागा मिळतील. तसेच महाराष्ट्रात ४८ पैकी आम्ही ४५ जागा जिंकू व देशात ३५० पेक्षा जास्त खासदार निवडून आणून नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील,’ असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यातील सरकारमध्ये कुठलाही वाद नाही...
राज्यात भाजप- सेना युती असताना उद्धव ठाकरे यांनी धाेका दिला. आज ज्यांचे पाच खासदारही निवडून येत नाही ते सध्या पंतप्रधानपदाचे स्वप्न पाहत असल्याची टीका त्यांनी पवार यांचे नाव न घेता केली. राज्यातील भाजप- सेना सरकारमध्ये कुठलाही वाद नाही. हे वाद केवळ माध्यमांमध्ये पाहण्यास मिळत असल्याचेही ते म्हणाले.
देशात महागाई वाढली याचा आम्ही स्विकार करतो; परंतु, देशातील ९० कोटी गरीब लोकांना सरकार मोफत रेशन देत आहे. ‘किसान सन्मान योजने’तून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करीत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ब्रिजभूषण सिंह यांची चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण होऊ द्या. चौकशीनंतर जी कारवाई होणार ती होणारच आहे. त्यामुळे यावर आता काही बोलणे योग्य राहणार नसल्याचे मौर्य यांनी सांगितले.