भाजपपाठोपाठ शिंदे गटाचेही ‘मिशन बारामती’; माजी मंत्र्यांचा बारामती, इंदापूर दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 08:55 PM2022-11-04T20:55:55+5:302022-11-04T20:58:10+5:30

एकनाथ शिंदे गटाकडूनही बारामती टार्गेट...

After BJP, Shinde group's 'Mission Baramati'; Former Minister's vijay shivtare visit to Baramati, Indapur | भाजपपाठोपाठ शिंदे गटाचेही ‘मिशन बारामती’; माजी मंत्र्यांचा बारामती, इंदापूर दौरा

भाजपपाठोपाठ शिंदे गटाचेही ‘मिशन बारामती’; माजी मंत्र्यांचा बारामती, इंदापूर दौरा

Next

बारामती : भाजपपाठोपाठ राज्यातील शिंदे गटानेदेखील बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या विस्तारासाठी आज (शनिवारी) माजी मंत्री विजय शिवतारे बारामती, इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

शिवसेनेतील बंडानंतर शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाणे पसंत केले आहे. शिवतारे हे बारामती लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या विस्तारीकरणासाठी लक्ष घालणार आहेत. त्यासाठी ते कार्यकर्त्यांची चाचपणी करतील. शिवतारे यांच्या बारामती दौऱ्यात शिंदे गटात कोणते पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार, त्यांची नावे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.

भाजपची जोरदार तयारी-

भाजप मिशन यशस्वी करण्यासाठी खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मैदानात उतरल्या आहेत. त्यांच्याबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे लक्ष ठेवून आहेत. येथील कार्यकर्त्यांना आगामी निवडणुका यशस्वी करण्यासाठी रणनीती आखण्याचे आदेशदेखील बावनकुळे यांनी दिले आहेत. त्यासाठी आवश्यक पाठबळ पुरविण्याचे आश्वासनदेखील बावनकुळे यांनी दिले आहे.

एकनाथ शिंदे गटाकडूनही बारामती टार्गेट-

त्यामुळे भाजपपाठोपाठ शिंदे गटानेदेखील बारामतीत लक्ष दिले आहे. राज्यातील सत्तांतरानंतर बारामतीत शिंदे गटाची पहिलीच बैठक होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाला नवीन कार्यकर्त्यांचा कितपत प्रतिसाद मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आता शिवतारे यांच्या दौऱ्याने राजकारण आणखी ढवळून निघणार आहे. या बैठकीत शिंदे गटाच्या विस्तारीकरणासाठी पहिले पाऊल बारामतीत पडणार आहे.

माजी मंत्री शिवतारेंचा दौरा- 

आगामी काळात नगरपरिषदेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे दोन्ही पक्षवाढीसाठी प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीनेही दोन्ही पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. शनिवारी सायंकाळी ४ वाजता शिवतारे हे तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

Web Title: After BJP, Shinde group's 'Mission Baramati'; Former Minister's vijay shivtare visit to Baramati, Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.