शर्तभंग केल्याने जागा सरकारजमा
By Admin | Published: June 24, 2017 06:09 AM2017-06-24T06:09:34+5:302017-06-24T06:09:34+5:30
हवेली तालुक्यातील वारजे येथील सर्व्हे नंबर ३५ मधील तब्बल १ हेक्टर ७६ आर जमीन भटक्या विमुक्तांच्या
सुषमा नेहरकर-शिंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हवेली तालुक्यातील वारजे येथील सर्व्हे नंबर ३५ मधील तब्बल १ हेक्टर ७६ आर जमीन भटक्या विमुक्तांच्या ‘रामनगर सहकारी गृहरचना संस्थे’ला विनामूल्य कब्जेहक्काने सन २००९मध्ये देण्यात आली होती. परंतु संस्थेने विनापरवाना विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्रक करून सदनिकांचे परस्पर हस्तांतरण केल्याचे निदर्शनास आले आहे. मूळ २१८पैकी एका मंजूर सभासदाला सदनिका न देता अन्य तब्बल ३९६ लोकांना सदनिकांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासामध्ये स्पष्ट झाली. यामुळे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी संस्थेने मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याने सर्व जमीन त्वरित सरकारजमा करण्याचे आदेश दिले आहेत.
सन २०१३मध्ये हा परिसर महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर या जागेपैकी सुमारे २६२३.२८ चौरस मीटर क्षेत्र विविध सुविधांसाठी महापालिकेकडे हस्तांतरण करण्यात आले. दरम्यानच्या कालावधीमध्ये शिल्लक जागेमध्ये तीन इमारतींचे बांधकाम करून तब्बल ३९६ सदनिकांचे वेगवेगळ्या लोकांना वाटप करण्यात आले. याबाबत अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. जमीन मंजुरी देताना २१८ सभासदांची यादी निश्चित केली होती. परंतु या प्रकरणात सभासद निवडीचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असताना नवीन ३९६ सभासदांना सदनिकांचे वाटप करताना कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नाही. संस्थेने विकसन करारनामा व कुलमुखत्यार पत्र करून जमिनीचे परस्पर हस्तांतरण केले.
नवीन ३९६ सभासदांना सदनिकांचे वाटप करून अॅग्रीमेंट करण्यात आले यासाठीदेखील कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्वत: संस्थेच्या अध्यक्षांनीच लेखी म्हणण्याद्वारे स्पष्ट केले आहे. गेल्या आठ वर्षांपासून संस्थेने अनेक बोगस कामे केली असल्याचे तपासणीमध्ये स्पष्ट झाले. यामुळे सौरभ राव यांनी संस्थेला दिलेली सर्व जमीन त्वरित सरकारजमा करण्याचे आदेश दिले.