घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड

By नितीश गोवंडे | Published: November 27, 2024 04:12 PM2024-11-27T16:12:14+5:302024-11-27T16:12:32+5:30

नेपाळी चोरट्याकडून तब्बल ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले

After burglarizing a house he came to the market to sell jewelery and was caught in a trap nepal thief arrest | घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड

घरफोडी करून दागिने विक्रीसाठी बाजारात आला अन् जाळ्यात सापडला, नेपाळी चोरटा गजाआड

पुणे : घरफोडी केल्यानंतर दागिने विक्रीसाठी आलेल्या नेपाळमधील चोरट्याला गुन्हे शाखेने अटक केली. नेपाळी चोरट्याकडून ११ लाख ५९ रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. चोरट्याने शहरातील उच्चभ्रू सोसायटीत घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अनिल मिनसिंग खडका (२५, सध्या रा. वारजे माळवाडी, मूळ रा. नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. खडकाने २२ नोव्हेंबर रोजी हडपसर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत घरफोडी केली होती. तो ज्येष्ठ नागरिकांची शुश्रुषा करायचा, यावेळी तो उच्चभ्रू सोसायटीतील बंद फ्लॅटची पाहणी देखील करायचा. हडपसर भागातील एका फ्लॅटमध्ये तो गॅलरीतून शिरला. त्यानंतर त्याने बेडरूममधील कपाट उचकटून दागिने आणि रोख रक्कम चोरी केली होती. ऐवज चोरून तो पसार झाला होता. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या युनिट पाच कडून समांतर तपास करण्यात येत होता. पसार झालेला खडका वारजे माळवाडी भागात दागिने विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस कर्मचारी अमित कांबळे आणि तानाजी देशमुख यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. त्याच्याकडून ११ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक युवराज हांडे, सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, प्रताप गायकवाड, प्रमोद टिळेकर, विनोद निंभोरे, विनोद शिवले आणि अकबर शेख यांनी ही कामगिरी केली.

Web Title: After burglarizing a house he came to the market to sell jewelery and was caught in a trap nepal thief arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.