चिंचवड नंतर आता पुणे स्टेशनवर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’; प्रवाशांसाठी २४ तास खान-पानाची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2023 07:39 PM2023-04-16T19:39:00+5:302023-04-16T19:39:09+5:30
दिवसेंदिवस या हॉटेलची वाढती प्रसिद्धी पाहता रेल्वे प्रशासनाने आणखी चार ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उभारण्याचा निर्णय
नितीश गोवंडे
पुणे : पुणेरेल्वे विभागातील दुसरे ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ पुणे रेल्वे स्टेशन येथे उभारण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, काम देखील सुरू झाले आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ मुळे प्रवाशांसाठी २४ तास खान-पानाची सुविधा सुरू होणार आहे.
रेल्वेच्या जुन्या डब्ब्यांचा वापर आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून करून घेण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ची संकल्पना २०२० मध्ये आली. जुन्या २४ मीटर लांबीच्या रेल्वेच्या डब्यात आकर्षक डेकोरेशन करून हॉटेल तयार केले जाते. यामध्ये नागरिकांना जेवण, नाष्टा आणि प्रादेशिक खाद्य-पदार्थांचा आस्वाद घेता येतो. ही सेवा २४ तास सुरू असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना कधीही याचा लाभ घेता येतो.
दिवसेंदिवस या हॉटेलची वाढती प्रसिद्धी पाहता रेल्वे प्रशासनाने आणखी चार ठिकाणी ‘रेस्टॉरंट ऑन व्हील’ उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याअंतर्गत पुणे विभागातील पहिले रेस्टॉरंट चिंचवड रेल्वे स्थानकावर मागच्या वर्षी डिसेंबर मध्ये सुरू करण्यात आले होते. आता पुणे विभागातील दुसरे रेस्टॉरंट ऑन व्हीलचे काम पुणे स्टेशन येथे सुरू झाले असून, पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
पहिले रेस्टॉरंट पश्चिम बंगालमध्ये..
या संकल्पनेअंतर्गत पश्चिम बंगालच्या आसनसोल रेल्वे स्थानकावर २६ फेब्रुवारी २०२० रोजी पहिले रेस्टॉरंट ऑन व्हील सुरू झाले. याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई आणि नागपूर येथे तसे रेस्टॉरंट सुरू केले. या दोन्ही ठिकाणी दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी जेवणाचा लाभ घेतला आहे.