परिस्थिती निवळल्यानंतर, दहावीची २०० गुणांची परीक्षा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:10 AM2021-05-06T04:10:45+5:302021-05-06T04:10:45+5:30

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा, याबाबत केवळ चर्चा सुरू असली, तरी कोरोनामुळे निर्माण झालेली ...

After clearing the situation, the exam of 200 marks of 10th? | परिस्थिती निवळल्यानंतर, दहावीची २०० गुणांची परीक्षा?

परिस्थिती निवळल्यानंतर, दहावीची २०० गुणांची परीक्षा?

Next

पुणे : इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने जाहीर करावा, याबाबत केवळ चर्चा सुरू असली, तरी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्णपणे निवळल्यानंतर, विद्यार्थ्यांची १०० ते २०० गुणांची परीक्षा घेण्याचा शिक्षण विभागाचा विचार आहे. तसेच, यासंदर्भातील प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाकडून लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. सीबीएसई बोर्डाने सुद्धा दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर करण्याचे निश्चित केले. परंतु, राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीकडून केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाबाबत काय करायचे, याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु, विद्यार्थ्यांकडे इयत्ता दहावीची परीक्षा दिल्याचे काहीतरी प्रमाणपत्र असावे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाकडून सर्व विषयांवर आधारित १०० ते २०० गुणांची एकच परीक्षा घेण्याचा विचार केला जात आहे.

कोरोनामुळे विद्यार्थी सद्य:परिस्थितीत परीक्षा केंद्रावर येऊन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे कोरोनाची परिस्थिती निवळल्यानंतर सुमारे दोन तासांची बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित परीक्षा घेण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून चाचपणी केली जात आहे. या परीक्षेत मिळालेले गुण हीच विद्यार्थ्यांची इयत्ता दहावीची गुणपत्रिका असणार आहे, असे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य व माध्यमिक शिक्षण मंडळाने अद्याप याबाबत कुठलाही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही.

पालकांना उत्सुकता

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निकालाबाबत काय निर्णय घेणार? याबाबत इयत्ता दहावीचे विद्यार्थी व त्यांचे पालक उत्सुक आहेत. सीबीएसई बोर्डाने निकालाबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सुद्धा दहावीच्या निकालाची पद्धती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त केले जात आहे.

Web Title: After clearing the situation, the exam of 200 marks of 10th?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.