सर्व गाेष्टींची पूर्तता केल्यानंतरच नाट्यगृह ताब्यात देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 07:41 PM2018-08-28T19:41:23+5:302018-08-28T19:42:59+5:30
नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत कलाकारांनी वारंवार नाराजी व्यक्त केल्याने अाता नाट्यगृह व्यवस्थापनाने याची गंभीर दखल घेतली अाहे.
पुणे : नाट्यगृहांमधील त्रुटींबाबत वेळाेवेळी कलाकार तसेच नाट्यनिर्मात्यांनी तक्रारी केल्यामुळे नाट्यगृहाच्या व्यवस्थापनाने त्याची गंभीर दखल घेतली अाहे. अाता नाट्यसंस्थांना रंगमंदिर ताब्यात देण्याअाधी स्वच्छता, विद्युत यंत्रणा अाणि ध्वनिव्यवस्था यांची पूर्तता केल्याबाबत संबंधित नाट्यसंस्थाच्या प्रमुखाची स्वाक्षरी घेण्यात येणार अाहे. यातून नाट्यगृह व्यवस्थापनाच्या कामात पारदर्शकता येण्यास मदत हाेणार अाहे. येत्या दाेन दिवसात या पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येणार अाहे.
अण्णाभाऊ साठे येथे 25 अाॅगस्ट राेजी अमर फाेटाे स्टुडिअाे या नाटकाचा प्रयाेग संपत असताना अचानाक प्रेक्षागृहातील एका दिव्याची ट्युब फुटली. त्यातून निघालेल्या ठिणग्या या थेट प्रेक्षकांच्या अंगावर पडल्या. सुदैवाने काेणाला ईजा झाली नसली तरी या घटनेमुळे प्रेक्षागृहात काहीसा गाेंधळ उडाला हाेता. त्यामुळे पुण्यातील नाट्यव्यवस्थापकांनी रंगमंदिरे व्यवस्थापक सदाशिव लायगुडे यांची भेट घेतली. सुनील महाजन, समीर हंपी, प्रवीण बर्वे, शशिकांत काेठवळे, दीपक काळे यांनी लायगुडे यांच्याशी चर्चा करुन विविध उपाय सुचवले. अाता काेणत्याही नाट्यसंस्थेला नाट्यगृह ताब्यात देण्याअाधी, स्वच्छता, ध्वनियंत्रणा, विद्युतयंत्रणा यांची पूर्तता केली गेली असल्याची स्वाक्षरी नाट्यसंस्थेच्या व्यवस्थापकाकडून एका रजिस्टरमध्ये घेण्यात येणार अाहे. त्यानंतरच संबंधित संस्थेला नाट्यगृह ताब्यात देण्यात येणार अाहे. अशी माहिती लायगुडे यांनी दिली. तसेच अनेकदा एखादा नाट्यप्रयाेग संपण्यास वेळ लागताे. त्यानंतर लगेचच पुढील नाट्यसंस्थेचे लाेक नाट्यगृहात प्रवेश करतात, त्यामुळे स्वच्छता करण्यास वेळ मिळत नसल्याचेही लायगुडे यांनी सांगितले.
स्वच्छतेचे निकष पूर्ण केल्याशिवाय रंगमंदिर ताब्यात देऊ नये. त्यातून ज्या संस्थेची चूक असेल त्या संस्थेकडून दंड आकारला जावा, अशी सूचना सुनील महाजन यांनी केली. स्वच्छता, सुरक्षा, विद्याुत यंत्रणा याची देखभाल ठेवण्यासाठी प्रशासनामध्ये पुरेसे कर्मचारी मिळाले पाहिजेत. रंगमंदिरामध्ये प्रसन्न वातावरण असेल तरच नाटकांना प्रेक्षकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा मनोरंजन संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी व्यक्त केली.