कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:08 AM2021-07-17T04:08:56+5:302021-07-17T04:08:56+5:30
पुणे : राज्यात कोरोना कमी होत असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात ...
पुणे : राज्यात कोरोना कमी होत असतानाच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झिका व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यात फवारणीचे आदेश दिले आहेत. झिका व्हायरसची लागण एडिस प्रकारच्या डासांपासून होते. डेंग्यूप्रमाणेच रुग्णामध्ये लक्षणे आढळून येतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये घरात आणि आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता राखावी, पाणी साठवून ठेवू नये, डासांची पैैदास होत असल्यास प्रशासनाची संपर्क साधून फवारणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
सध्या केरळमध्ये झिका विषाणूची लागण झालेले रुग्ण सापडत आहेत. आतापर्यंत २८ जणांना झिका विषाणूचा संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, झिका विषाणू हा डासांमधून निर्माण होणारा प्लेव्हिव्हायरस आहे. आतापर्यंत झिका विषाणूचा संसर्ग आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात दिसून आला आहे. एडिस प्रकारच्या डासांपासून डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचा संसर्ग होतो. याच प्रकारच्या डासांपासून झिका विषाणूची लागण होते. मात्र, हा आजार जीवघेणा नाही. ९९ टक्के रुग्ण यातून बरे होऊ शकतात.
---------------------
कशामुळे होतो?
झिका विषाणू हा डासांमधून निर्माण होणारा प्लेव्हिव्हायरस आहे. एडिस प्रकारच्या डासांपासून डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांचा संसर्ग होतो. याच प्रकारच्या डासांपासून झिका विषाणूची लागण होते. मात्र, हा आजार जीवघेणा नाही.
--------------
लक्षणे काय?
* ताप येणे
* शरीरावर लाल चट्टे पडणे
* गुडघेदुखी किंवा अंगदुखी
* अशक्तपणा येणे, भूक न लागणे
* डोकेदुखी
---------------
झिका हा डेंग्यूच्या पठडीतलाच विषाणू आहे. डासांमधून हा विषाणू पसरतो. झिका विषाणूच्या संसर्गाची लक्षणे डेंग्यूप्रमाणेच असतात. प्रामुख्याने, अंगदुखी, डोकेदुखी, डोळे लालसर होणे, शरीरावर लाल चट्टे येणे अशी लक्षणे दिसतात. औैषधोपचारांनी सहा-आठ दिवसांमध्ये बहुतांश रुग्ण बरे होतात. १ टक्का रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होणे, तीव्र रूप धारण करणे असे परिणाम दिसू शकतात. गर्भवती महिलांना झिका विषाणूच्या संसर्गाचा जास्त धोका असतो. गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये लागण झाल्यास बाळाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. काही उदाहरणांमध्ये बाळाच्या मेंदूचा विकास होत नाही आणि बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकते. कोरोनाची लागण कमी होत असताना झिका व्हायरसने डोके वर काढणे ही धोक्याची घंटा आहे. हे डास विशेषत: सकाळच्या वेळेत चावतात.
- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ
----------------
उपाययोजना काय?
* घरात पाणी जास्त दिवस साठवून ठेवू नये.
* फूल स्लीव्हजचे कपडे घालावेत.
* घरात स्वच्छता राखावी.
* डासांचा प्रादुर्भाव होत असल्यास फवारणी करुन घ्यावी.