उमेदवारी नाकारल्यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळेंची 'ही' प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 02:20 PM2019-03-23T14:20:13+5:302019-03-23T14:22:27+5:30
यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रीया शिराेळे यांनी दिली आहे.
पुणे : पुण्याच्या जागेवर भाजापकडून काेणाला उमेदवारी मिळणार याची जाेरदार चर्चा सुरु असताना काल रात्री उशीरा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिराेळे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यापुढेही पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करत राहील अशी प्रतिक्रिया शिराेळे यांनी दिली आहे.
पुण्याच्या लाेकसभेच्या जागेवर भाजपाकडून काेणाला उमेदवारी मिळाणार याची उत्सुकता भाजप कार्यकर्त्यांना हाेती. विद्यमान खासदार अनिल शिराेळे, शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे सहयाेगी खासदार संजय काकडे आदी उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक हाेते. काल रात्री जाहीर झालेल्या यादीमध्ये पुण्याची उमेदवारी बापट यांना जाहीर करण्यात आली. आज भाजपाच्या कार्यकर्त्यांनी वाजत गाजत बापट यांचे भाजप कार्यालयात स्वागत केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष याेगेश गाेगावले, महापाैर मुक्ता टिळक, उममहापाैर सिद्धार्थ धेंडे, आमदार विजय काळे, माधुरी मिसाळ, खासदार जगदीश मुळीक आदी उपस्थित हाेते. शिराेळे काही वेळाने बापट यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजप कार्यालयात दाखल झाले.
शिराेळे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, भारतीय जनता पक्षाने आजवर जी जबाबदारी माझ्यावर टाकली ती प्रामाणिकपणे,पूर्ण शक्तिनिशी पार पाडण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. नेत्यांनी वेळोवेळी माझ्यावर टाकलेल्या या जबाबदा-यांसाठी मी सर्व नेत्यांचा ऋणी आहे. पक्षाने १९९२ पासून पुणे शहरातून चार वेळा नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली, एकदा विरोधी पक्ष नेता म्हणूनही मला काम करता आले याचा आनंद आहे. याबरोबरच ४ वर्षे स्थायी समिती सदस्यत्व आणि दोन वेळेला पक्षाचा शहराध्यक्ष या नात्याने पुणेकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी निवडून आणत पुणेकरांनीही माझ्यावर विश्वास दाखविला. या नंतरही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाचे काम करीत राहीन. पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता या नात्याने जास्तीत जास्त मतांनी पुण्याची लोकसभेची जागा निवडून आणण्यासाठी मी कार्यरत असेन.