पराभवानंतर पुन्हा विजयातही नामुष्कीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 02:28 AM2018-02-24T02:28:20+5:302018-02-24T02:28:20+5:30
महापालिका हद्दीबाहेर निधी देण्याचा ठराव संख्याबळाअभावी नामंजूर झाल्यामुळे पराभवाची नामुष्की चाखायला लागलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तोच ठराव शुक्रवारच्या सभेत फेरविचार प्रस्तावाद्वारे मंजूर करून घेतला खरा
पुणे : महापालिका हद्दीबाहेर निधी देण्याचा ठराव संख्याबळाअभावी नामंजूर झाल्यामुळे पराभवाची नामुष्की चाखायला लागलेल्या महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने तोच ठराव शुक्रवारच्या सभेत फेरविचार प्रस्तावाद्वारे मंजूर करून घेतला खरा, मात्र त्यातही त्यांना नामुष्कीच पदरी घ्यावी लागली. कारण या ठरावाला मागील सभेत विरोध करणारे मनसेचे वसंत मोरे यांनी भाजपावर टीका करीत आपली उपसूचनाच मागे घेतली.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर दत्ता धनकवडे व नगरसेवक युवराज बेलदरे यांनी त्यांची उपसूचना कायम ठेवली. त्यामुळे या विषयावर मतदान झाले. त्यात उपसूचनेच्या बाजूने राष्ट्रवादी, तसेच काँग्रेसने मतदान केले, तर ती फेटाळण्याच्या बाजूने भाजपा, शिवसेना यांनी मतदान केले व मूळ प्रस्ताव मान्य झाला. त्यावरील चर्चेत योगेश ससाणे, युवराज बेलदरे, गफूर पठाण, प्रकाश कदम, मनीषा कदम, वसंत मोरे आदींनी सहभाग घेतला. महापालिका हद्दीबाहेरच्या मांगडेवाडी, भिलारेवाडी व अन्य काही गावांचे सांडपाणी, मैलापाणी कात्रजच्या तलावात येते. त्यामुळे या गावांना मलवाहिन्या विकसित करण्यासाठी १० कोटी रुपये निधी देण्याचा विषय होता. हद्दीबाहेर निधी द्यायचा असेल तर त्यासाठी सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांची मंजूरी लागले. एकट्या भाजपाची सभागृहातील सदस्यसंख्या त्यापेक्षा जास्त आहे. तरीही त्यांना मागील वेळी या विषयावर पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे फेरविचार प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र त्यासाठीची मुदत पूर्ण झालेली नाही, सदस्यांना नोटीस दिलेली नाही, फेरविचार प्रस्ताव करायचा त्यासाठी असल्यास कायद्याने करायच्या तरतुदी पाळलेल्या नाहीत, असे बरेच मुद्दे भय्या जाधव यांनी उपस्थित केले. नगरसचिव पारखी यांनी त्यांना उत्तरे दिली. फेरविचार बेकायदा पद्धतीने आणला आहे, असे जाधव यांचे म्हणणे होते. मात्र पारखी यांनी ते अमान्य केले. दरम्यान, वसंत मोरे यांनी हद्दीबाहेर निधी दिला जातो, पण हद्दीतल्या योजना पैशांअभावी बंद केल्या जात आहेत, १५ वर्षे काम करणाºया महिलांना कामावरून काढले जात आहे, अशी टीका केली. योगेश ससाणे यांनी मांजरी शेवाळे या गावांनाही त्यांच्या याच कामासाठी निधी द्यावा, त्यांच्या सांडपाण्याचा हडपसरला त्रास होतो आहे, अशी मागणी केली. मनीषा कदम, प्रकाश कदम यांनी या प्रस्तावाच्या बाजूने भाषण केले. मोरे यांनी त्या १० कोटी मधून १ कोटी रुपये कात्रज तलाव विकसनाकरिता द्यावेत, अशी उपसूचना केली, तर राष्ट्रवादीने हद्दीबाहेरच्या गावांसाठी या पद्धतीचे धोरण कायम स्वीकारावे, अशी उपसूचना केली.
सभागृहनेते उपसूचना स्वीकारण्याच्या मन:स्थितीत होते, मात्र भाजपाच्या अन्य सदस्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे हा ठराव मतदानाला टाकण्यात आला. मतदानाला ठराव टाकला असतानाच मोरे यांनी भाजपाच्या सदस्यांनी आपल्या भावना समजून घेतल्या जात नाहीत, असे सांगितले.
कात्रज तलाव आपल्या प्रभागात येत नाही, तरीही आपण त्याच्या विकसनासाठी १ कोटी ठेवा असे सांगत आहे ते तिथे तलाव चांगला व्हावा, यासाठीच भाजपाला तसे वाटत नसेल तर आपण आपली उपसूचना मागे घेतो, असे त्यांनी स्पष्ट केले. बेलदरे व धनकवडे यांनी मात्र उपसूचना कायम ठेवली. मतदान होऊन ती फेटाळली गेली व निधी देण्याचा मूळ प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मोरे यांनी आपली उपसूचना मागे घेत भाजपावरच कात्रज तलावाच्या विकासनाला त्यांचा विरोध असल्याचा ठपका ठेवला.