अवकाळीनंतर राज्यात आता सुटले थंड वारे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 05:34 AM2019-11-11T05:34:31+5:302019-11-11T05:34:41+5:30
अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातल्यानंतर आता थंड वारे वाहू लागले आहे.
पुणे : अवकाळी पावसाने राज्यातील अनेक भागात थैमान घातल्यानंतर आता थंड वारे वाहू लागले आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून काही भागांतील कमाल व किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट होऊ लागली आहे. त्यामुळे लवकरच हुडहूडी भरणारी थंडी पडेल, असा अंदाज आहे.
रविवारी राज्यात अहमदनगर येथे सर्वात कमी १४.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा १.३ अंशाने कमी होते. त्यापाठोपाठ महाबळेश्वर येथे सर्वात कमी १५.५ अंश तापमानाची नोंद झाली. मुंबई, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव, अकोला व पणजीमधील कमाल तापमान सरासरीच्या खाली आले होते. मुंबई व रत्नागिरीसह सातारा येथील किमान तापमानात सरासरीपेक्षा घट झाल्याची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे.
राज्याच्या अनेक भागात सकाळी दाट धुक्याची चादर पसरत आहे. त्याचा परिणाम, विमान उड्डाणांसह रस्ते वाहतुकीवरही होत आहे. संध्याकाळपासूनच हवेत काहीसा गारवा येत असून रात्री त्यात वाढ होत आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.