दुष्काळानंतर कांद्याने रडविले
By admin | Published: May 29, 2016 03:45 AM2016-05-29T03:45:45+5:302016-05-29T03:45:45+5:30
मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामतीच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो
बारामती : मागील दोन महिन्यांपासून कांद्याचे दर सरासरी ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. बारामतीच्या बाजार समितीमध्ये कांद्याला प्रतिकिलो ५ ते ६ रुपये दर मिळत आहे, तर, किरकोळ बाजारामध्ये कांदा ८ ते १० रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याच्या घसरलेल्या दराचा फटका प्रामुख्याने बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील गावांना बसला आहे.
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जिरायती भागातील कारखेल, उंडवडी, देऊळगाव रसाळ, कारखेल या भागातून मोठ्याप्रमाणात कांद्याची आवक होत आहे. बाजारात नवीन गरवी हंगाम सुरू झाला आहे. तसेच, तालुक्यातील काही भागातील शेतकऱ्यांनी पाणी असल्याने उसाचे पीक टाळून कांदा केला. उष्णतेमुळे कांदा साठवणूक करणे शेतकऱ्याला जिकिरीचे जात आहे. त्यामुळे बाजारात कांदाविक्रीसाठी येत आहे. परिणामी घाऊक व किरकोळ बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. घाऊक बाजारात ५ ते ६, तर किरकोळ बाजारात ८ ते १० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आवक वाढल्याने दर घसरले असून, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
गतवर्षी कांद्याचे दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे कांदालागवडीकडे यंदा कल वाढला. अगदी काही ऊस उत्पादकांनीदेखील कांदा लागवडीला प्राधान्य दिले.
मात्र, वाढलेली आवक, घसरलेले कांद्याच्या दरामुळे त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. कांद्याचा उत्पादन कालावधी ऊस पिकाच्या तुलनेने कमी आहे. त्यामुळेदेखील कांदा लागवडीकडे कल वाढीस लागल्याचे चित्र आहे.
दराच्या प्रतीक्षेत काहींनी कांदा साठवणुकीला प्राधान्य दिले. मात्र, साठविलेला कांदा खराब होण्याच्या भीतीपोटी बाजारात आणावा लागत आहे. कांद्याला हमीभाव देण्याची मागणी
होत आहे.
मागील वर्षीपेक्षा सध्या आवक कमी आहे; मात्र यावर्षी उष्णतेमुळे कांद्याला उठाव मिळाला नाही. उष्णतेमुळे गुणवत्ताही ढासळली आहे. याचा परिणाम दरावर होऊन कांद्याचे दर घसरले आहेत; तसेच उष्णतेचा कडाका कायम असल्याने शेतकरी कांदा साठवूही शकत नाही.
- अरविंद जगताप, सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती