अठरा वर्षांनंतर तिच्या जीवनातील अंधार झाला दूर
By admin | Published: April 10, 2015 05:32 AM2015-04-10T05:32:15+5:302015-04-10T05:32:15+5:30
वयाच्या १७व्या वर्षी म्हणजे जाई खामकर या महिलेची दृष्टी गेली. यानंतर १८ वर्षे अंधकारमय जीवन व्यतीत केलेल्या जाईच्या डोळ्यांची यशस्वी
प्रवीण गायकवाड, शिरूर
वयाच्या १७व्या वर्षी म्हणजे जाई खामकर या महिलेची दृष्टी गेली. यानंतर १८ वर्षे अंधकारमय जीवन व्यतीत केलेल्या जाईच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया करून डॉ. स्वप्निल भालेकर या नेत्रतज्ज्ञाने तिच्या जीवनातील अंधार दूर केला. एल.व्ही.पी. केरॅटोप्रोस्थेसिस (विशिष्ट प्रकारचे कृत्रिम बुब्बुळरोपण) या किचकट प्रकारच्या शस्त्रक्रियेद्वारे जाईवर उपचार करण्यात आले असून, भारतात फक्त हैदराबाद येथेच अशा प्रकारची शस्त्रक्रिया केली जाते.
जाई या बारावीत असताना इंजेक्शनच्या रिअॅक्शनमुळे त्यांची दृष्टी गेली होती. विद्यार्थिदशेत झालेला हा फार मोठा आघात होता.
महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरही त्यांनी विविध रुग्णालयांत जाऊन विविध नेत्रतज्ज्ञांकडे दृष्टी परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, सर्वांनीच आता दृष्टी परत येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
एल.व्ही.पी. कॅरेटोप्रॉस्थेसिस या प्रकारची शस्त्रक्रिया करणारे जगात १५, तर भारतात केवळ चार डॉक्टर्स आहेत. यात डॉ. भालेकर यांचा समावेश आहे. त्यांनी ८ फेब्रुवारी (प्रथम टप्पा) व ५ एप्रिलला (दुसरा टप्पा) अशा प्रकारे त्यांच्यावर कृत्रिम बुब्बुळरोपणाची शस्त्रक्रिया केली. सहा तासांची ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. या प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला दृष्टी येण्यासाठी काहींना आठ दिवस, तर काहींना पाच महिनेही लागू शकतात. मात्र, जाई यांना दोन दिवसांतच दृष्टी आली. जीवनातील अंधार आता दूर होणारच नाही, असे समजून जाई या जीवन व्यतीत करीत होत्या. मात्र, डॉ. भालेकरांनी जाईच्या जीवनातील अंधार दूर केला.
दृष्टी आली आता जग पाहता येईल, तसेच माझ्या चिमुकलीला मी पाहू शकते, यातच जीवन सार्थक झालं. डॉ. भालेकरांच्या रूपाने दृष्टिदाता मिळाला, अशी प्रतिक्रिया जाईने दिली.
डॉ. भालेकर म्हणाले, विविध प्रकारे रिअॅक्शनमुळे दृष्टी गमावलेले रुग्ण उमेद सोडून देतात. अशा रुग्णांसाठी ही शस्त्रक्रिया वरदान ठरली आहे.
जळगाव येथील चिंधू साळुंके या ९५ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीबरोबरच पिंपळगाव येथील अलका तांबेकर, नारायणगाव येथील सरस्वती खोले, बारामती येथील जगताप आदी रुग्णांवरही अशा प्रकारची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.