अठरा वर्षे पूर्ण होताच तब्बल अडीच हजार जणांनी नोंदविले नाव...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 06:55 PM2018-10-10T18:55:17+5:302018-10-10T18:59:02+5:30
आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे.
पुणे : निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राबविण्यात येणाऱ्या मतदार नोंदणी मोहिमेत १८ ते २० वयोगटातील युवकांमध्ये नाव नोंदविण्याचा उत्साह दिसून येत आहे. रविवारी (दि. ७) आणि मंगळवारी (दि. ९) राबविण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणी मोहीमेत २ हजार ४५० अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूकीत त्यांना पहिल्यांदाच मतदान करण्याचा हक्क मिळणार आहे. या दोन्ही मोहीमेत मिळून ६ हजार २२५ मतदारांनी नावे नोंदविली आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या ३० आॅक्टोबरपर्यंत छायाचित्रावर आधारित मतदार यादी अद्ययावत करण्यात येत आहे. ज्या मतदारांची १ जानेवारी २०१९ रोजी पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण होतील, त्यांना मतदार नोंदणी करता येणार आहे. आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक रविवारी सर्व मतदान केंद्रावर विशेष मोहीम दिन राबविण्यात येणार आहे. या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान केंद्रावर उपस्थित असतील. या वेळी मतदार नोंदणी अर्ज वाटप करण्याबरोबरच ते योग्य कागदपत्रे सादर करुन स्वीकारण्यात येतील. त्याचप्रमाणे १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये आॅक्टोबर महिन्यातील प्रत्येक मंगळवारी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रविवारी (दि. ७) जिल्ह्यात झालेल्या मतदार नोंदणीत १८ ते १९ वयोगटातील १ हजार ५९० व्यक्तींनी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज दिला. तर, १९ वयोगटावरील ३ हजार ८०६ व्यक्तींनी अर्ज भरले आहेत. अशा ५ हजार ३९६ व्यक्तींनी मतदार नोंदणीचे अर्ज भरले आहेत. मंगळवारी (दि. ९) जिल्ह्यातील महाविद्यालयात राबविण्यात आलेल्या विशेष मोहीमेत १८ ते १९ वयोगटातील ६२९ आणि त्या वरील वयोगाटतील २३१ अशा ८६० विद्यार्थ्यांनी अर्ज दिले आहेत. वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच २ हजार ४५० युवकांनी नाव नोंदणी केली आहे.