माझ्याकडे बैठक संप्रदायाइतकी शिस्त नाही, निवडणुकीनंतर रेवदंडा येथे शिस्त शिकायला येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 07:52 PM2019-03-05T19:52:37+5:302019-03-05T19:58:36+5:30
माझ्याकडे बैठक संप्रदायातील दासांइतकी (अनुयायी) शिस्त नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर रेवदंडा येथे शिस्त शिकायला येणार असल्याचा इरादा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात बोलून दाखवला.
पुणे : माझ्याकडे बैठक संप्रदायातील दासांइतकी (अनुयायी) शिस्त नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर रेवदंडा येथे शिस्त शिकायला येणार असल्याचा इरादा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात बोलून दाखवला.
वनदेवी मंदिर कर्वेनगर ते शिंदे पूल शिवणे या मुख्य एनडीए रस्त्याला महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉ. नानासाहेब तथा नारायण विष्णू धर्माधिकारी पथ असे नामकरण फलकाचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते मंगळवारी केले. यावेळी तीर्थरूप डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री मिळाल्याबद्दलसत्कार करण्यात आला. गणपती माथा येथील एनडीएच्या मैदानात हजारो बैठक संप्रदायातील दासांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री सुनील तटकरे, यांच्यासह धर्माधिकारी परिवारातील सदस्य, सचिन दोडके, सायली वांजळे, दीपाली धुमाळ, दत्ता धनकवडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी सुळे म्हणाल्या की,बैठक संप्रदायातील सदस्यांच्या शिस्तीची दाद देते. माझ्याकडे तुमच्या सारखी शिस्त नाही. शिस्त शिकण्यासाठी निवडणुकीनंतर आठवडाभर रेवदंडा येथे राहून शिस्त शिकणार आहे. समाजाला आध्यात्मची गरज आहे. धर्माधिकारी परिवार गेली अनेक वर्षे समाजकार्य करीत आहे.
शरद पवार म्हणाले की,नानासाहेब धर्मधिकारी हे कर्तृत्ववान व दूरदृष्टी असलेले व्यक्तीमत्व होते. समाजमनाच्या विचाराबरोबर परिसर स्वच्छता हा देखील त्याचा ध्यास होता त्यामुळे त्यांनी दिलेले विचार व संस्कार वैयक्तिक जीवन जगताना आचरणात आणले पाहिजे. यातून आपण त्यांचे स्मरण सर्वांनी जपले पाहिजे.
धर्माधिकारी म्हणाले, चांगल्या विचारांची आज गरज आहे. मन स्वच्छ असले पाहिजे तर सर्व स्वच्छ दिसेल. सध्या अनेकजण चंगळवादाकडे वळत आहे. त्यांना, मानवता धर्माची शिकवण ही संत साहित्याच्या माध्यमातून पोचविली पाहिजे.. संशयामुळे माणूस भरकटतो. सध्या बहुतेक ठिकाणी होत असलेल्या समर्थ बैठकीमुळे हे प्रमाण कमी आले आहे. बैठकीतील लोकांनी परीसर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केले. सुनिल तटकरे व नगरसेवक सचिन दोडके यांनी देखील विचार व्यक्त केले.