निवडणुकीनंतर लोकप्रतिनिधी सरसावले
By admin | Published: October 21, 2014 05:11 AM2014-10-21T05:11:24+5:302014-10-21T05:11:24+5:30
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर शहरामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याचा साक्षात्कार लोकप्रतिनिधींना सर्वसाधारण सभेत झाला.
पुणे : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर शहरामध्ये डेंग्यूच्या साथीने थैमान घातल्याचा साक्षात्कार लोकप्रतिनिधींना सर्वसाधारण सभेत झाला. प्रशासनाकडून उपाययोजनाच करण्यात येत नाहीत. प्रशासन हलगर्जीपणे काम करत आहे, असा आरोप करीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मुख्यसभेत थैमान घातले. तसेच साथ आटोक्यात आणण्यासाठी आणखी प्रभावी उपाय योजना राबवाव्यात, अशी मागणीही या वेळी नगरसेवकांनी केली. गेल्या सहा महिन्यांत सुमारे ३ हजार रुग्ण आढळलेले असून, सहा जणांचा मृत्यू झालेला आहे.
विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे यांनी सभागृहामध्ये डेंग्यू नियंत्रणात आणण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरले आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नाहीत. औषध फवारणी करण्यासाठी औषधे उपलब्ध नाहीत. त्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे सांगितले. तर महापालिका प्रशासनाकडे औषध फवारणीसाठी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नाही.
औषधाचे प्रमाण किती असावे, याबाबत प्रशिक्षण देण्यात येत नाही. रुग्णांची संख्या जास्त आहे, खासगी रुग्णालयामधून नागरिक उपचार घेत आहेत. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये प्लेट-लेट तपासणी करण्याची यंत्रणा नसल्यामुळे रुग्णांना लॅबमध्ये जाऊन तपासणी करावी लागत असल्याचे रिपाइंचे गटनेते डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी सफाई विभागातील कर्मचाऱ्यांनासुद्धा आरोग्य विभागाकडे वर्ग केले पाहिजे. साठवलेले स्वच्छ पाणी ओतून द्या, तरच डेंग्यूवर नियंत्रण आणता येईल, असे उपमहापौर आबा बागूल यांनी या वेळी बोलताना सांगितले. तसेच पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यात येत नाही. याठिकाणी तपासणीची यंत्रणा
नाही. प्रशासन संपूर्णपणे डेंग्यूवर नियंत्रण आणण्यासाठी अपयशी
ठरले आहे. धूर फवारणीसाठी मशिन नाहीत. अपुरा कर्मचारी वर्ग
असल्याची उत्तरे प्रशासनाकडून देण्यात येत असल्याचा आरोप या वेळी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आला. (प्रतिनिधी)