नेत्यांच्या गटबाजीनंतर शहराध्यक्षपदावरून भाजपमध्ये घमासान; विद्यमानांनी केली मुदतवाढीची मागणी

By राजू इनामदार | Updated: April 16, 2025 16:11 IST2025-04-16T16:10:25+5:302025-04-16T16:11:17+5:30

शहराध्यक्षपदाला अनेकजण इच्छुक असून घाटे यांचे शहराध्यक्षपद काही जणांनी अडचणीत आणले आहे

After factionalism among leaders there is a clash in BJP over the post of city president Incumbents demand extension of term | नेत्यांच्या गटबाजीनंतर शहराध्यक्षपदावरून भाजपमध्ये घमासान; विद्यमानांनी केली मुदतवाढीची मागणी

नेत्यांच्या गटबाजीनंतर शहराध्यक्षपदावरून भाजपमध्ये घमासान; विद्यमानांनी केली मुदतवाढीची मागणी

पुणे: दीनानाथ रुग्णालय प्रकरणात नेत्यांच्या गटबाजीचे दर्शन झाल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेत शहराध्यक्षपदावरून वाद सुरू झाले आहेत. इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, विद्यमान कार्यकारिणीतील काहीजणांनी मुंबईत धाव घेत थेट प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन त्यांनाच मुदतवाढीचे साकडे घातले आहे.

नेत्यांमधील गटबाजी

राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘दीनानाथ’मधील गर्भवती माता उपचार प्रकरणाशी संबंधित डॉ. घैसास यांच्या वडिलांचा दवाखाना महिला आघाडीने फोडल्यावरून नाराजी व्यक्त करत स्पष्ट भूमिका घेतली. यातून भाजपची पारंपरिक मतपेढी दुखावली गेली असल्याचा त्यांचा मुद्दा बाजूला ठेवत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिला आघाडीचा पाठराखण केली. त्यावरून त्यांच्यातील मतभेद उघड झाले. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनीही त्यावेळी नेत्यांची री ओढत खासदार कुलकर्णी यांचे नाव न घेता त्यांच्यावर प्रसारमाध्यमांबरोबर संपर्क साधल्यावरून टीका केली.

शहराध्यक्षपदाला अनेकजण इच्छुक

आता घाटे यांचेच शहराध्यक्षपद त्या पदासाठी इच्छुक असलेल्या काहीजणांनी अडचणीत आणले आहे. पक्षाच्या सध्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष बदलायचे असल्याने या निवडणुका होणे पक्षासाठी गरजेचे आहे. त्यामुळे ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यात पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीतही बदल अपेक्षित आहेत. त्यामुळेच या पदासाठी इच्छुक असलेले या पक्षाचे काही माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक सरसावले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षे झाली प्रलंबित आहेत. त्यामुळे पक्षाचे बहुसंख्य स्थानिक नेते अस्वस्थ आहेत. कोणतेही पद नसल्याने ही अस्वस्थता आली आहे. आता बदल होणारच असतील तर संघटनेचे पद तरी पदरात पाडून घ्यावे, या विचाराने ते मोर्चेबांधणी करत आहेत.

नेत्यांची मनधरणी

त्यासाठी राज्यातील नेत्यांची मनधरणी करणे, त्यांची भेट घेणे, त्यांना समजावणे असे प्रकार सुरू आहेत. स्थानिक नेत्यांपैकी अनेकांचे राज्यातील नेत्यांबरोबर चांगले संबंध आहेत. त्याचा उपयोग करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. विद्यमान कार्यकारिणीकडून कार्यक्रम होत नसल्याची तक्रार त्यात प्रामुख्याने करण्यात येत आहे. नियमित बैठका घेणे, पक्षाच्या विविध आघाड्या सक्रिय ठेवणे, पक्षावर विरोधकांकडून टीका होत असेल तर त्याला मुद्देसूद प्रत्युत्तर देणे अशा गोष्टी होत नाहीत; त्यामुळे संघटना स्तरावर पक्ष शांत झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच नव्यांना संधी द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

विद्यमानही सरसावले

दरम्यान, याची कुणकुण लागल्याने विद्यमान कार्यकारिणीतील पदाधिकारीही आता आपले पद राखण्यासाठी सरसावले आहेत. भाजपमध्ये कोणत्याही पदाची मुदत तीन वर्षे असते. विद्यमान कार्यकारिणीला फक्त दोन वर्षे झाली आहेत. या दोन वर्षांतही लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यामुळे संघटनास्तरावर काम करण्याची संधी मिळाली नाही. याच कारणासाठी प्रदेशाध्यक्षपदात बदल करायचा असला तरी सध्याच्या कार्यकारिणीला त्यांची तीन वर्षांची मुदत पूर्ण करू द्यावी, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. हीच मागणी घेऊन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सध्याच्या कार्यकारिणीने थेट मुंबईत जाऊन भेट घेतली. त्यांना या संदर्भातील निवेदनही देण्यात आले आहे.

फक्त पुणेच नाही तर राज्यातील बहुसंख्य शहर व जिल्हा कार्यकारिणींनाही फक्त दोनच वर्षे झाली आहेत. त्यांचीही मागणी मुदत पूर्ण होऊ द्यावी अशीच आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील. तो आम्हाला मान्य असेल. - धीरज घाटे, पुणे शहराध्यक्ष, भाजप.

Web Title: After factionalism among leaders there is a clash in BJP over the post of city president Incumbents demand extension of term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.