दुष्काळापाठोपाठ महागाईच्या झळांची तीव्रता वाढली

By admin | Published: August 31, 2015 03:55 AM2015-08-31T03:55:18+5:302015-08-31T03:55:18+5:30

दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या

After the famine, the intensity of inflation increased | दुष्काळापाठोपाठ महागाईच्या झळांची तीव्रता वाढली

दुष्काळापाठोपाठ महागाईच्या झळांची तीव्रता वाढली

Next

बारामती : दुष्काळाच्या झळांपाठोपाठ आता महगाईच्याही झळा बसू लागल्या आहेत. कांदा ग्राहकांना रडवत असतानाच सर्वसामान्यांच्या आहारातील महत्त्वाच्या घटक असणाऱ्या डाळींचे दर गगनाला भिडले आहेत. तूरडाळ होलसेल बाजारात १६० रुपये किलोवर पोहोचल्याने डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. तूरडाळीसह सर्वच डाळींनी दरांचा उच्चांक गाठला आहे. गरिबांच्या ताटातून वरण-आमटी गायब होऊ लागली आहे.
ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक कुटुंबात आहारामध्ये डाळींचा वापर केला जातो. भात-वरण, वरण-भाकरी गरिबांचे अन्न समजले जाते; मात्र या वरणाच्या सर्वच डाळींचे दर मागील काही महिन्यांपासून कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाकाचे गणित बिघडू लागले आहे. वाढलेल्या दराचा परिणाम बाजारातही जाणवू लागला आहे. मागील काही दिवसांपासून डाळींच्या मागणीतही घट झाली आहे, तर आठवडेबाजारातून डाळींची मागणी करणारे ग्राहकच गायब असल्याचे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. विक्रीसाठी आणलेली १० किलो तूरडाळीचीदेखील एका महिन्याच्या कालावधीत विक्री झाली नसल्याचे येथील व्यापारी बाळू खिंडारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सर्वसामान्य कुटुंबामध्ये रोजच्या जेवणात डाळीचे वरण, आमटी यांचा समावेश असतो. विशेषत: आजारी व्यक्ती व ज्येष्ठांच्या आहारात वरण अत्यावश्यक पदार्थ आहे. ऐन दुष्काळी परिस्थितीत सर्वत्र मंदीचे वातावरण आहे. त्यातच मानवी जीवनातील मूलभूत गरज असणारे अन्न महागले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक मेटाकुटीस आला आहे.
डाळींपाठोपाठ जेवणाची लज्जत वाढवणारा कांदा अजूनही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. बाजारात सध्या मध्यम प्रतीचा कांदा प्रतिकिलो ६० रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचबरोबर केरळ येथील ‘सांबर कांदा’ १२० रुपये किलो दराने विकला जात आहे. या कांद्याला हॉटेल व्यावसायिकांकडून चांगली मागणी आहे, असे येथील विक्रेत्यांनी सांगितले.
(वार्ताहर)

Web Title: After the famine, the intensity of inflation increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.