मारामारी, चोरी साेडून ते झाले ‘जिम ट्रेनर’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:09 AM2022-11-12T11:09:00+5:302022-11-12T11:10:30+5:30

चुकून वाममार्गाला लागलेल्या चाैदाशे बालकांना पुणे शहर पाेलिसांकडून सन्मार्गावर...

After fighting and stealing, he became a 'gym trainer' pune police | मारामारी, चोरी साेडून ते झाले ‘जिम ट्रेनर’

मारामारी, चोरी साेडून ते झाले ‘जिम ट्रेनर’

googlenewsNext

- प्रशांत बिडवे

पुणे : मित्रांची संगत, व्यसनाधीनता, वस्तूंचा माेह आणि पैशांचे आकर्षण यामुळे वाट चुकून वाममार्गाला लागलेल्या चाैदाशे बालकांना पुणे शहर पाेलिसांकडून सन्मार्गावर आणण्यात आले. गुन्हेगारीपासून परावृत्त झालेली काही मुले सध्या व्यवसाय प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील चार मुलांनी गुन्हेगारीचा मार्ग साेडला आहे. ते आता जिम ट्रेनर म्हणून नागरिकांना व्यायामाचे धडे देत आहेत.

शहरामध्ये बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. खून, जिवे मारण्याचा प्रयत्न, वाहन आणि माेबाइल चाेरी, बलात्कारासारख्या गुन्ह्यांतही अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. यातील अनेक जण काेणताही गुन्हेगारी उद्देश नसताना केवळ मित्रांच्या साेबत म्हणून मारामारी, चाेरी करीत गुन्हेगारीकडे वळतात. मात्र, वेळीच याेग्य वयात त्यांचे समुपदेशन करण्यात आले आणि त्यांना याेग्य-अयाेग्य काय? हे पटवून दिले तर ते पुन्हा शिक्षण घेत उत्तमप्रकारे जीवन जगण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू शकतात. अशा अजाणत्या वयात गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांच्या चुकलेल्या पावलांना याेग्य मार्ग दाखविण्याचे काम पुणे शहर पाेलीस दलाच्या भराेसा सेलअंतर्गत विशेष बालसुरक्षा पथक करीत आहे.

गुन्ह्यांत बालगुन्हेगारांचा सहभाग आढळून आल्यानंतर, अशा मुलांच्या समुपदेशनासाठी पाेलीस आयुक्त कार्यालयात भराेसा सेल येथे कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात प्रत्येक शुक्रवारी विधिसंघर्षित मुलांना आणि त्यांच्या पालकांना बाेलावून घेतले जाते. मुले गुन्हेगारीकडे का वळत आहेत? त्यांना काय अडचण आहे? त्यांना काही मदत हवी आहे काय? याबाबत विचारणा केली जाते. गुन्हेगारीपासून परावृत्त व्हावेत यासाठी त्यांचे समुपदेशन करण्यात येते. काेराेना प्रादुर्भाव काळातही पथकाचे हे काम सुरूच हाेते आणि शेकडाे मुलांना आणि पालकांना काॅल करून संपर्क साधला आणि मुलांबाबत विचारणा करण्यात आली.

विधिसंघर्षित मुलांना घरच्या हलाखींच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेणे शक्य नाही, त्यांना व्यावसायिक शिक्षण देत पायावर उभा करण्यावर भर दिला जात आहे. या कामासाठी ‘पंख फाउंडेशन’, ‘हाेप फाॅर द चिल्ड्रेन’ या सेवाभावी संस्थेचीही मदत घेण्यात येत आहे. दरम्यान, ज्या चार मुलांना जिममध्ये व्यायाम शिकविण्याचा जिम ट्रेनर हा काेर्स माेफत शिकविण्यात आला.

वर्ष / समुपदेशन केलेल्या मुलांची संख्या २०२२ ऑक्टाेबर अखेर १५४

२०२१ / ७०८

२०२० / ५०२

शहरात दहा बाल स्नेही कक्षांची स्थापना

बाल गुन्हेगारी कमी करण्यासह मुलांचे प्रश्न साेडविणे यासाठी पुणे शहरात लष्कर पाेलीस ठाण्यात पहिले बालस्नेही कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यानंतर सिंहगड राेड, वारजे, काेथरूड, दत्तवाडी, अलंकार, उत्तमनगर, येरवडा, खडकी आणि विश्रांतवाडी पाेलीस ठाण्यातही कक्ष सुरू झाले आहेत.

गुन्हेगारांकडून बालकांचा हाेताेय वापर

काही वर्षांपूर्वी गुन्हेगाराकडून चाेरी, मारामारी आदी गुन्हे करण्यासाठी अल्पवयीन मुलांचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले हाेते. त्यामुळे अशाप्रकारे गुन्हेगारीकडे वळणाऱ्या मुलांना वेळीच चुकीच्या मार्गाबाबत समजावून सांगितले जाते.

माेबाइल-संगणक दुरुस्ती, फ्रीज, एसी, दुचाकी आणि चारचाकी वाहने दुरुस्ती, प्लंबिंग या काेर्सेसला १३ मुलांनी प्रवेश घेतला आहे. काही महिन्याच्या प्रशिक्षणानंतर ते स्वत:चा व्यवसाय सुरू करतील किंवा इतर ठिकाणी नाेकरी करून स्वत:च्या पायावर उभा राहतील.

- अर्चना कटके, सहायक निरीक्षक, विशेष बाल सुरक्षा पथक

Web Title: After fighting and stealing, he became a 'gym trainer' pune police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.