अखेर पाच दिवसांनंतर पूर्व भागाला पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 01:20 AM2018-10-02T01:20:00+5:302018-10-02T01:21:27+5:30
मुक्ता टिळक : लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्राला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा
पुणे : मुठा उजवा कालवा फुटीनंतर विस्कळीत झालेला शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा तब्बल ५ दिवसांनंतर सुरळीत होणार आहे. खडकवासला धरणातून कॅनॉलमध्ये १५० क्युसेक्सने लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्राला पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून (दि. २) पूर्व भागाचा पाणीपुरवठा सुरळीत सुरु होईल, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध स्वरूपाच्या विद्युत दुरुस्तीसाठी गुरुवारी (दि. २७) संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्याच दिवशी सकाळी सव्वा अकरा वाजता मुठा उजवा कालवा फुटला. यामुळे लष्कर जलकेंद्राला कॅनॉलद्वारे होणार पाणीपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे गेल्या पाच दिवसांपासून शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा जवळजवळ बंदच होता. याबाबत महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले की, कालवा फुटीमुळे लष्कर जलकेंद्राच्या हद्दीत पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोड द्यावे लागेल. परंतु कालव्याची तातपुरती दुरुस्ती करून लष्कर जलकेंद्राला पाणी मिळेल यासाठी तात्पुरत्या स्वरूपात बंधारा बांधण्यात आला आहे. सध्या १५० क्युसेक्सने कालव्यात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारपासून नेहमीप्रमाणे लष्कर जलकेंद्रातून ३५० एमएलडीने पाणीपुरवठा सुरू होणार असल्याचे मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केले.
सध्या महापालिका प्रशासनाकडून येथील नागरिकांची शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी पाण्याच्या लाईन दुरुस्त करण्यात येत आहेत. स्वच्छतागृह अणि विद्युत विभागाकडुन प्रकाश व्यवस्था करण्यात येत आहे. नागरिकांकडुन करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेवून काम करण्यात येत आहे. येथील नागरिकांची संपुर्ण मदत करण्यात येणार असल्याचे
टिळक यांनी
सांगितले.
कालवा फुटीत ९८ झोपड्या पूर्णपणे उद्ध्वस्त
कालवा फुटल्यानंतर अनेक घरांमध्ये पाणी शिरले. याचा पंचनामा आता महापालिका आणि जलसंपदा विभागाकडून पूर्ण करण्यात आला आहे. झोपड्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे ९८ झोपड्या पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. या नागरिकांनी पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे महापौर टिळक यांनी सांगितले. यापुढे अतिक्रमण रोखण्यासाठीसुद्धा प्रयत्न केले जाणार आहेत.