अभियंत्यांचा कामचुकारपणामुळे पुण्यातील रस्त्यांवर हजारो खड्डे; पावसानंतर पालिकेला जाग
By निलेश राऊत | Published: July 19, 2023 06:59 PM2023-07-19T18:59:11+5:302023-07-19T18:59:33+5:30
३१ मेपर्यंत खड्डे बुजविण्यास सांगूनही कामचुकारपणा केल्याप्रकरणी या कारवाईला आता कनिष्ठ अभियंत्यांना सामोरे जावे लागणार आहे...
पुणे : शहरातील खड्ड्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता असून, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आजपासून शहरातील सर्व रस्त्यांची पाहणी करणार आहेत. यामध्ये ज्या रस्त्यावर खड्डे आहेत, त्या ठिकाणच्या कनिष्ठ अभियंत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत खड्डे बुजविण्यास सांगूनही कामचुकारपणा केल्याप्रकरणी या कारवाईला आता कनिष्ठ अभियंत्यांना सामोरे जावे लागणार आहे.
शहरातील रस्त्यांवरील पडलेले खड्डे, खचलेले चेंबर मे अखेर दुरूस्त होणे अपेक्षित होते. परंतु आजही हजारो खड्डे शहरातील सर्वच रस्त्यांवर आहेत. यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी नुकतीच पथ विभाग, अतिक्रमण विभाग, बांधकाम विभाग, घनकचरा विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन शहरातील खड्डे चार दिवसात बुजविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी आक्रमक पवित्रा घेत आजपासून शहरातील सर्व रस्त्यांवर पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी जेथे खड्डा दिसेल तेथील कनिष्ठ अभियंत्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.
दरम्यान येत्या चार दिवसात शहरातील सिंहगड रस्ता, बाणेर रस्ता, कात्रज रस्तासह पंधरा मुख्य रस्ते तातडीने खड्डेमुक्त करण्यासाठी पथ विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना युध्दपातळीवर काम करण्यास सांगण्यात येणार आहे. शहरात केवळ दुसरा मोठा पाऊस झाला तरी रस्त्यांची दुरावस्ता झालेली याला कारण ३१ मे पूर्वी खड्डे दुरूस्तीची कामे अपूर्ण ठेवणे हेच आहे. यामुळे आता पाऊस असला तरी येत्या दोन-चार दिवसात कोल्डमिक्सचा वापर करून पावसातही खड्डे बुजविण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांसह कनिष्ठ अभियंत्यांना देण्यात आल्या असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.