चार तासांनंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 03:49 PM2018-09-27T15:49:26+5:302018-09-27T15:50:00+5:30
पोलिसांनी सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविल्याने शहरातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
पुणे : पर्वती येथे मुठा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. दांडेकर पूल वसाहत आणि सिंहगड रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते खबरदरीचा उपाय म्हणून पोलिसांनी सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक वळविल्याने शहरातील मध्यवस्तीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, पाणी ओसरु लागल्याने चार तासानंतर दुपार नंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु करण्यात आली.
दांडेकर पुलाजवळ गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास कालवा फुटल्याने त्याचे पाणी वेगाने वाहून सिंहगड रस्त्यावर आले. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलापासून सिंहगडकडे जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. दांडेकर पुलाच्या चौकातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने हा चौकातील वाहतूकही बंद पडली. त्याचा परिणाम होऊन सारसबागेकडून येणारी पूर्णपणे थांबली. त्यामुळे वाहनांच्या रांगा सारसबागेपर्यंत गेल्या. पाठोपाठ मित्रमंडळ चौक, पर्वती दर्शन या भागात वाहतूक कोंडी झाली.
पाण्याचा वेग सुरुवातीच्या काळात जास्त असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सिंहगड रस्त्याकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. त्यात निलायम चौकाकडून दांडेकर पुलाकडे जाणारा रस्ता, अभिनव चौकातून टिळक रस्त्याकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता. परिणामी पर्यायी रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदाशिवपेठ, बाजीराव रस्त्याकडील शुक्रवारपेठेचा भाग, टिळक रस्ता, बाजीराव रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मध्यवस्तीतील प्रमुख रस्ते बंद झाल्याने त्याचा ताण डेक्कन, जंगली महाराज रस्ता, कर्वेरस्ता परिसरातील वाहतुकीवर झाला. त्यामुळे येथेही वाहनकोंडी झाली होती. तसेच या रस्त्यांना पुरक असलेल्या रस्त्यावरील वाहतुकीचा वेगही मंदावला होता.
तसेच, सेनादत्त पोलीस चौकी, शास्त्री रस्त्यावरही वाहनांची रांग लागली होती. कालव्यातील पाणी बंद केल्यानंतर काही तास वाहतुक कोंडीचा कालवा सुरु होता.
दुपारी दोन नंतर सिंहगड रोडवरील वाहतूक सुरु झाल्यानंतर ही कोंडी फुटून वाहतूक हळूहळू सुरळीत झाली.