निवडून आल्यावर गावातून थेट केरळ, गोवा, कुलू-मनालीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:11 AM2021-01-21T04:11:38+5:302021-01-21T04:11:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. आता सरपंचपद आपल्याकडे घेत गाव ताब्यात ठेवण्याची स्पर्धा सुरु झाली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. आता सरपंचपद आपल्याकडे घेत गाव ताब्यात ठेवण्याची स्पर्धा सुरु झाली आहे. काठावर बहुमत असलेल्या गावांमध्ये आतापासूनच सदस्यांची पळवापळवी सुरू झाली आहे. गाव पुढारी व स्थानिक नेत्यांकडून या सदस्यांना थेट केरळ, गोवा, कुलमनाली सारख्या सहलीच्या स्थळी महिन्या-महिन्याचे बुकींग करुन धाडले जाऊ लागले आहे. “रम्य स्थळी खाओ, पिओ, मजा करो, पण सरपंचपद आपल्याकडेच पायजेल,” यासाठी हे मोफत पर्यटन सुरु झाल्याचे सांगण्यात येते.
ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांच्या निकालाची अंतिम घोषणा (नोटिफिकेशन) आता थेट २९ जानेवारीला होणार आहे. त्यानंतर तीस दिवसात सरपंच आरक्षणाची सोडत काढण्याचे आदेश असल्याने निवडून आलेल्या या उमेदवारांना सरपंच-उपसरपंच निवडणुकीपर्यंत कसे सांभाळायचे, हीच चिंता पॅनल प्रमुख आणि इच्छुक सरपंचांपुढे आहे.
पुणे जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. आता या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि उपसरपंचांची निवडणूक होणार आहे. सद्यस्थितीत या सर्व ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त केलेला आहे. सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीच्या तारखा प्रशासनाकडून जाहीर होणार आहेत. या प्रक्रियेत ३० ते ४० दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यामुळे अटीतटीच्या लढती झालेल्या अनेक गावांमध्ये उमेदवार पळवापळवीसाठी ‘फिल्डिंग’ लावली जात आहे.
चौकट
आरक्षण सोडत त्वरीत करा
उमेदवार पळवापळवीचे प्रकार सुरू झाल्याने सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सरपंच आरक्षण सोडत तात्काळ काढावी. येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये सरपंच, उपसरपंच निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करावा अशी मागणी राज्य शासनाकडे आणि राज्य निवडणूक आयोगाकडे होत आहे. या मागणीचा विचार राज्य निवडणूक आयोगाकडून केला जाण्याचे संकेत आहेत.