उजनीच्या पाणीसाठ्याचे अर्धशतक पार, पाचच दिवसांत २० टक्क्यांनी वाढला पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 07:31 PM2023-10-03T19:31:40+5:302023-10-03T19:33:27+5:30
परतीचा पाऊस असाच पडत राहिल्यास पंधरा दिवसांत धरण ८० ते १०० टक्क्यांपर्यंत जाईल असा विश्वास धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे....
बाभुळगाव (पुणे) :पुणे, सोलापूर, नगर, धाराशिव जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या उजनी धरणात २९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या पाचच दिवसांत २० टक्क्यांनी पाणीसाठा वाढला आहे. मंगळवार दि. ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता उजनीचा पाणीसाठा ५०.३५ टक्क्यांवर पोहोचला, अशी माहिती उजनी धरणाचे सहायक अभियंता प्रशांत माने यांनी दिली आहे. परतीचा पाऊस असाच पडत राहिल्यास पंधरा दिवसांत धरण ८० ते १०० टक्क्यांपर्यंत जाईल असा विश्वास धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.
साेमवारी (दि.२) सकाळी सहा वाजता ३९९८२ क्युसेकने आवक सुरू होती. या वर्षीच्या पावसाळ्यात तुलनेत सर्वाधिक आवक झाल्याची नोंद झाली आहे. पावसाळा सुरू होऊन चार महिने उलटून गेले तरीपण उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. दि.६ मे रोजी धरणाचा उपयुक्त पाणीसाठा शून्यावर येऊन ऐन पावसाळ्यात दि.९ जुलै रोजी वजा ३६.१९ एवढ्या प्रमाणात पाणीसाठा खालावला होता, तर दि.१ ऑगस्ट रोजी धरणाचा पाणीसाठा पुन्हा ‘प्लस’वर आला. पुणे परिसरातील उजनी धरणाच्या साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्याने संथ गतीने दि.३१ ऑगस्ट रोजी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १५.७३ टक्क्यांवर पोहोचला,तो कमी अधिक प्रमाणात पंधरा दिवस त्याच पटीत राहिला. दि.३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता १८१७५ क्युसेकने आवक होत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरण साखळी क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. उजनीच्या धरण साखळीतील पुणे जिल्ह्यातील बारा धरणे शंभर टक्के भरल्याने भीमा नदीतून उजनीत पाण्याची आवक वाढली आहे.
उजनी धरणाच्या वाढलेल्या पाणीसाठ्याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, दौंड या तालुक्यांसह सोलापूर, नगर, धाराशिव जिल्ह्यातील शहरासह शेतकऱ्यांची तूर्तास तरी काही प्रमाणात चिंता मिटली आहे. परंतु येत्या काही दिवसांत पावसाळा संपणार असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरेल की नाही ही चिंता मात्र शेतकऱ्यांना सतावत आहे. सध्या उजनी धरणातून भीमा नदीसह सर्वच प्रकल्पात पाण्याचा विसर्ग बंद आहे.
उजनी धरणाची पाणी पातळीची स्थिती-
दि. ३ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता
२५६६.६७ दशलक्ष घनमीटर पाणी पातळी.
९०.६३ टीएमसी पाणीसाठा.
७६३.८६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीपातळी
२६.९७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा
धरण पाणी स्थिती ५०.३६ टक्के