पुण्यात पसरली धुक्याची चादर; पावसापासून पुणेकरांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 10:49 AM2019-11-07T10:49:04+5:302019-11-07T11:01:37+5:30
पुण्यात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अखेर हिवाळा सुरू झाला याचा आनंद पुणेकरांना झाला.
पुणे - गेल्या काही दिवसांपासून सतत पडण्याऱ्या पावसामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांची गुरुवारची (7 नोव्हेंबर) सकाळ आल्हाददायक झाली. सकाळी शहरात धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली. त्यामुळे अखेर हिवाळा सुरू झाला याचा आनंद पुणेकरांना झाला.
मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने पाऊस पडत आहे. सकाळी तसेच दुपारी कडक ऊन अन संध्याकाळी होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पुणेकर मेटाकुटीला आले होते. स्वेटर, टोपी आणि रेनकोट अशा सर्वच गोष्टी सोबत बाळगायला लागत होत्या. त्यातच वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे अनेक साथीचे आजार सुद्धा शहरात पसरण्यास सुरुवात झाली होती.
अखेर आज सकाळी शहरात धुके पसरल्याने हिवाळ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. ऑक्टोबर महिना संपला तरी पाऊस सुरूच त्या थंडीची चाहूल ही नाही असे चित्र मागील काही दिवसांपासून होते. मात्र असे असताना आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना एक वेगळेच दृश्य दिसले. शहरातील अनेक ठिकाणी धुक्याची चादर पसरलेली पाहायला मिळाली.
पुणे शहराच्या आसपास अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पर्वती, वेताळ टेकडी, हनुमान टेकडी, तळजाई यासारख्या टेकड्यांवर पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांना आज हे धुके पाहायला मिळाले. हे धुके इतके दाट होते की काही अंतरावरचे ही दिसत नव्हते. त्यामुळे पहाटे घराबाहेर पडलेल्या पुणेकरांनी आज धुक्याचा मनमुराद आनंद लुटला.