यंदा भरपूर पाऊस, कोरोनानंतर आता शहरात पुराची धास्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:12 AM2021-06-09T04:12:07+5:302021-06-09T04:12:07+5:30
पुणे : हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली असतानाच, पुणे महापालिकेच्या सर्वच विभागाने कोरोना आपत्तीशी लढा ...
पुणे : हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस होईल, अशी शक्यता वर्तविली असतानाच, पुणे महापालिकेच्या सर्वच विभागाने कोरोना आपत्तीशी लढा देतानाच, आता खबरदारी म्हणून पावसाळ्यापूर्वीच आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे़ कारण कोरोनानंतर आता पुराची धास्ती लागून राहिली आहे. विशेषत: अग्निशामक दलाचे महत्त्वपूर्ण काम असल्याने, त्यांनी आपल्या साधनसामग्रीची उभारणी करून येणाऱ्या संभाव्य अपघातांना सामोरे जाताना कुठलीही कमतरता भासणार नाही याची दक्षता घेतली आहे़
पुणे शहरात मोठा पाऊस झाल्यावर साधारणत: पाटील इस्टेट झोपडपट्टी, कामगार पुतळा झोपडपट्टी, फुलेनगर झोपडपट्टी, पुलाचीवाडी झोपडपट्टी, खिलारे पाटील झोपडपट्टी, आंबिल ओढा झोपडपट्टी, शिवणे येथील नदीकाठचा भाग, कात्रज तलाव परिसर, औंध जुना पुल, बाणेर व पाषाण येथील काही भाग, बोपोडी येथील हॅरिस पुलाजवळील झोपडपट्टी व सिंहगड रोड येथील नदीकाठचा भाग यांचा समावेश होतो़ यामुळे जादाचा पाऊस झाल्यावर व धरणातून मुळा-मुठा नद्यांमध्ये पाणी सोडल्यावर या भागात पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरते़ त्यामुळे या भागावर महापालिकेच्या आपत्ती विभागाकडून विशेष लक्ष केंद्रीत केले गेले आहे़ याकरिता अग्निशामक दलानेही तयारी पूर्ण केली असून, यामध्ये रेस्क्यू व्हॅनसह अन्य साधनांची पूर्तता करून ठेवली आहे़
यामध्ये मोठा वादळी पाऊस झाल्यावर बहुतांशी ठिकाणी मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडतात़ यामुळे खबरदारी म्हणून अग्निशामक दलाने असे उन्मळून पडलेले वृक्ष कापण्यासाठी २६ इलेक्ट्रिक चेन सॉ तयार ठेवले असून, यांसह १६ पेट्रोल टेलिस्कोपिक सॉही मध्यवर्ती अग्निशामक दलासह उपकेंद्रांकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत़
-------------
अग्निशामक दलाकडे असलेली साधन सामग्री
रेस्क्यू व्हॅन - ७ रोप लॉन्चर, एक पोर्टेबल लाईट मास्ट, १३ इंफ्राटेबल टॉवर लाईट मास्ट, १ वायरलेस ट्रंक रेडिओ़ यांसह अग्निशामक दलाच्या सर्व विभागातील गाड्या़
फायबर बोटी - ३, याचबरोबर ३ इंजिनसह रबरी बोट व २ अॅल्युनियम बोट
लाईफ जॅकेट - १००
लाईफ बॉय -१००
रोप लॉन्चर - ७
-----------------------
शहरातील धोकादायक इमारतींवर विशेष लक्ष
शहरातील धोकादायक ठरणाऱ्या इमारती व वाडे यांच्याकडे महापालिकेने एक महिन्यापासून विशेष लक्ष दिले असून, आत्तापर्यंत महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागातील १५९ वाड्यांसह ४ इमारतींवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने कारवाई केली आह़े़ तर १५५ इमारती रिकाम्या करून त्या तातडीने दुरुस्त करून देण्याची सूचना संबंधित मालकांना दिली गेली आहे़
-----------
पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या आपत्ती विभागासह विशेषत: अग्निशामक विभागाला अधिक दक्ष राहावे लागते़ झाडे उन्मळून पडणे, इमारतीचा काही भाग जीर्ण झाल्यामुळे कोसळणे अशावेळी रेस्क्यू ऑपरेशन करावे लागते़ या अनुभव लक्षात घेता अग्निशामक विभागाने पूर्ण तयारी केली आहे़ गेल्या महिन्यात शहरात झालेल्या मोठ्या पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष पूर्णपणे उन्मळून पडले होते, पण माहिती मिळताच अग्निशामक दलाने काही तासात ते हटवून रस्ते मोकळे करून दिले़
प्रशांत रणपिसे,
मुख्य अग्निशमन अधिकारी, पुणे महापालिका