मुलीच्या 'त्या' वाक्याने मन हेलावून टाकलं आणि त्यांनी थेट सहा हजार झाडांना वेदनामुक्त केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 06:45 PM2019-02-24T18:45:55+5:302019-02-24T18:55:52+5:30
मुक्या झाडांना वेदनांपासून मुक्त करणाऱ्या पुण्यातील माधव पाटील यांनी विडा उचलला असून आत्तापर्यंत महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यांमधील सहा हजाराहून अधिक झाडांना वेदनामुक्त केले आहे.
पुणे : मुक्या झाडांना वेदनांपासून मुक्त करणाऱ्या पुण्यातील माधव पाटील यांनी विडा उचलला असून आत्तापर्यंत महाराष्ट्राबराेबरच इतर राज्यांमधील सहा हजाराहून अधिक झाडांना वेदनामुक्त केले आहे. त्यांच्या या माेहीमेची कहाणी तेवढीच इमाेशनल आहे. चार वर्षापूर्वी पाटील कुटुंबीय सहलीसाठी 10 दिवस काेलकात्याला गेले हाेते. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या घरातील झाडांसाठी पाण्याची व्यवस्था केली हाेती. पाण्याच्या बाटलीच्या सहाय्याने त्यांनी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्याचे ठरवले हाेते. परंतु जाण्याची गडबडीत त्यांच्याकडून बाटलीचे झाकण उघडायचे राहून गेले. 10 दिवस पाणी न मिळाल्यामुळे ती झाडं मरुन गेली. मेलेली झाडं पाहिल्यावर त्यांची 4 वर्षाची हिरकणी ही मुलगी ''बाबा आपण झाडांना मारुन टाकलं'' असं म्हणाली. हे वाक्य ऐकून पाटील यांचं मन हेलावून गेलं आणि सुरु झाला झाडांना वेदनामुक्त करण्याचा प्रवास.
माधव पाटील गेल्या अनेक वर्षांपासून झाडांना वेदनामुक्त करत आहेत. 'नेल फ्री पेन फ्री ट्री' हे त्यांच्या माेहीमेचे वाक्य आहे. शहरातील झाडांवर विविध जाहीरातींचे बाेर्ड खिळे मारुन टांगलेले असतात. यामुळे त्या झाडाची तसेच निसर्गाची हानी हाेत असते. झाड सजीव असते परंतु त्याला बाेलता येत नसल्याने त्यांचे दुःख त्यांना व्यक्त करता येत नाही. माधव पाटील त्यांचे दुःख दूर करतात. सुरुवातील माधव आणि त्यांच्या काही मित्रांनी पुण्यात ही माेहीम सुरु केली. दर रविवारी पुण्यातील एक भाग निवडून तेथील झाडांना ठाेकण्यात आलेले खिळे ते काढत असत. पाहता पाहता ही माेहीम वाढत गेली. त्यांना शहरातील अनेक वृक्षप्रेमींनी साथ दिली. आत्तापर्यंत या माेहिमेत तब्बल 500 स्वयंसेवक सहभागी झाले असून त्यांनी 50 हजाराहून अधिक खिळे 6 हजाराहून अधिक झाडांवरुन काढले आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर बिहार, तामिळनाडू, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये देखील ही माेहिम सुरु आहे.
माधव पाटील यांनी या आधी 'अंघाेळीची गाेळी' ही माेहीम सुरु केली हाेती. काही वर्षांपूर्वी मराठवाडा आणि विदर्भात दुष्काळामुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यामुळे पाणी वाचविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस आंघाेळ करायची नाही असे या माेहिमेचे धाेरण हाेते. त्या दिवशी अंघाेळीची गाेळी घ्यायची असे ते म्हणत. या माेहिमेला देखील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना 'मामाच्या गावाला जाऊया' या माेहिमेअंतर्गत त्यांनी पुण्याची अनेक वर्षे सैर घडवली आहे. सध्या ते उघड्यावर जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विराेधात माेहिम राबवत आहेत. त्याचबराेबर सिंहगडावर टाकण्यात येणाऱ्या प्लाॅस्टिकच्या बाटल्या देखील गाेळा करण्याचे काम ते करतात. त्यांचे हे काम सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.