चौकशीनंतर परांजपे बंधुंना सोडले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:52+5:302021-06-26T04:09:52+5:30
पुणे : बांधकाम व्यावसायिक शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) घरी सोडले. मुंबई पोलिसांनी ...
पुणे : बांधकाम व्यावसायिक शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे यांना मुंबई पोलिसांनी शुक्रवारी (दि. २५) घरी सोडले. मुंबई पोलिसांनी या दोघांना फसवणुकीप्रकरणी गुरूवारी सायंकाळी पुण्यातून ताब्यात घेऊन मुंबईला नेले होते. परांजपे कुटुंबियांशी संबंधित वसुंधरा डोंगरे यांनी विलेपार्ले पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
परांजपे यांच्या काही जागा या मुंबईतील विलेपार्ले परिसरात आहेत. फिर्यादी या वारस असताना त्यांना काहीही न सांगता, त्यांना कळू न देता ही जागा विकण्यात आली. हा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे चौकशीसाठी परांजपे बंधूंना मुंबईला नेण्यात आले होते.
या प्रकरणाबाबत कुटुंबियांच्या वतीने अमित परांजपे यांनी माहिती दिली. ते म्हणाले “परांजपे कुटुंबियांच्या मिळकतीतील हिस्स्यावरुन कुटुंबातीलच एका व्यक्तीने गैरसमजुतीतून विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा विषय हा संपूर्णत: कौटुंबिक मिळकतीतील हिस्सेदारी बाबतचा आहे. ‘परांजपे स्किम्स’ या कंपनीशी व व्यवसायाशी त्याचा संबंध नाही. माझे वडील शशांक व काका श्रीकांत प्राथमिक चौकशी नंतर पुण्यात परतले आहेत.”
विलेपार्ले पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर श्रीकांत, शशांक तसेच त्यांच्या काही चुलत भावंडांनादेखील त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी मुंबईत बोलावले होते. तक्रारदार व्यक्तीखेरीज परांजपे कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत. या प्रकरणी कोणासही अटक केले नसल्याचा खुलासा पोलिसांनी अगोदरच केला आहे. हा विषय हा संपूर्णत: कौटुंबिक मिळकतीतील हिस्सेदारी बाबतचा असल्याचे अमित परांजपे यांनी म्हटले आहे.