काेयता गँगनंतर आता ‘स्पुफिंग कॉल’! प्रतिष्ठित व्यक्तींचा मोबाइल क्रमांक वापरून मागितली जातेय खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 09:22 AM2023-03-28T09:22:20+5:302023-03-28T09:25:02+5:30

स्पुफिंग काॅलद्वारे खंडणी मागण्याचा प्रकार पुण्यात प्रथमच उघड...

After Koyta Gang, now 'spoofing call' Extortion is being demanded using the mobile number of eminent persons | काेयता गँगनंतर आता ‘स्पुफिंग कॉल’! प्रतिष्ठित व्यक्तींचा मोबाइल क्रमांक वापरून मागितली जातेय खंडणी

काेयता गँगनंतर आता ‘स्पुफिंग कॉल’! प्रतिष्ठित व्यक्तींचा मोबाइल क्रमांक वापरून मागितली जातेय खंडणी

googlenewsNext

- विवेक भुसे

पुणे : माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करून त्यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिक मित्राकडे तीन कोटी रुपयांची मागणी करण्याचा प्रयत्न झाला आहे. थेट प्रतिष्ठित व्यक्तींचा मोबाइल क्रमांक वापरून इंटरनेटवरून स्पुफिंग काॅलद्वारे खंडणी मागण्याचा प्रकार पुण्यात प्रथमच उघड झाला आहे. सायबर क्राइमच्या या प्रकाराचा वाढता धोका समोर आला आहे. संदीप पाटील याने हा सर्व प्रकार केला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखेनेही तत्परता दाखवत सापळा रचून दहा लाख रुपये स्वीकारताना दोघांना पकडले. संदीप पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील. गेल्या काही वर्षांपासून ताे पुण्यात असतो. त्याचे बी.कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. पूर्वी एका बँकेत कामाला होता. कोरोनाकाळात त्याची नोकरी गेली. त्याने १० टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. कर्जाचा डोंगर वाढत असल्याने शाॅर्टकट मार्गाने भरपूर पैसे कमविण्याच्या नादाने त्याने इंटरनेटवरून स्पुफिंग काॅल कसा करायचा याचे धडे घेतले, असे त्याने पोलिसांना सांगितले.

ट्रॅपमध्ये हाेते ३० ते ४० जण :

संदीप पाटील याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने अशा प्रकारे ३० ते ४० प्रतिष्ठित लोकांचे मोबाइल नंबर मिळविले होते. त्यातून त्याने काही ठिकाणी प्रयत्नही केले. परंतु, त्यात त्याला यश मिळाले नाही.

या प्रतिष्ठितांनाही गंडा घालण्याचा प्रयत्न :

- तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए बोलत असल्याचे भासवून एकाने फसविण्याचा प्रयत्न केला होता.

- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नावानेही अनेकांची फसवणूक झाली होती.

- सीरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक आदर पूनावाला यांच्या नावाने व्हॉट्सॲप मेसेज करून कोट्यवधींची फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता.

..अशी घ्या खबरदारी

सायबर क्राइममध्ये स्पुफिंग कॉल हा प्रकार नवीन आहे. इंटरनेटचा वापर करून आयपी स्पुफिंग, ईमेल स्पुफिंग, वेबसाइट स्पुफिंग हल्ला असे काही प्रकार घडत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रतिष्ठित व्यक्तीचा फोन आला. मेल आला तर संबंधितांशी प्रत्यक्ष संपर्क साधून खरंच त्यांनी अशा प्रकारे मेसेज केला आहे का किंवा फोन केला आहे का, याची खात्री करावी.

असा केला काॅल... :

- संदीप पाटील हा मुरलीधर मोहोळ यांच्या मावस भावाला लँड लाइनवरून काॅल करून सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर फिर्यादींना फोन करून मोहोळ यांचे त्याला समजलेले ठिकाण सांगून आपण त्यांच्याच फोनवरून बोलत असल्याचे भासविले होते. फिर्यादी हे मोहोळ यांचे चांगले मित्र असल्याने ते अशाप्रकारे दुसऱ्याकडून आपल्याला सांगणार नाहीत, याची खात्री असल्याने त्यांनी स्वत: मोहोळ यांना फोन करून चौकशी केली. तेव्हा मोहोळ यांनी आपण कोणाला असे सांगितले नसल्याचे सांगितले. तसेच त्यांना त्याचे स्क्रीन शॉट पाठविले. त्यानंतर मोहोळ यांनी पुन्हा फोन करून त्यांना आपण असे कॉल केले नसल्याचे सांगितले.

- एका बाजूला मोहोळ यांच्याशी बोलणे सुरू असतानाच फिर्यादी यांना मोहोळ यांच्या नंबरवरून कॉल येत होता. तेव्हा हे प्रकरण गंभीर असल्याचे मोहोळ यांच्या लक्षात आले. त्यांनी सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना हा प्रकार सांगितला. त्यापाठोपाठ सर्व चक्रे हलली आणि गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकाने शहरभर नजर ठेवून पळून जाणाऱ्या संदीप पाटील याला जुन्या कात्रज घाटात नाकाबंदी करून पकडले.

‘स्पुफिंग कॉल’चा प्रकार पुण्यात प्रथमच घडला आहे. आपली फसवणूक टाळण्यासाठी लाेकांनी कोणालाही पैसे देण्यापूर्वी त्यांच्या नेहमीच्या नंबरवर संपर्क साधून खात्री करावी. त्यानंतरच व्यवहार करावा.

- मीनल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे

Web Title: After Koyta Gang, now 'spoofing call' Extortion is being demanded using the mobile number of eminent persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.