Friendship Day: निवडणुकीत साहेबांकडून पराभूत झाल्यावर आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या - विठ्ठल मणियार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 02:35 PM2023-08-06T14:35:51+5:302023-08-06T14:37:13+5:30

शरद पवारांच्या कामाचा आवाका, माणसं जोडणं, वेळ आणि शिस्त पाळण्याची त्यांच्या सवयी अनेक गोष्टी शिकवून गेल्या

After losing to sharad pawar in the elections our friendship strings were tied Vitthal Maniyar | Friendship Day: निवडणुकीत साहेबांकडून पराभूत झाल्यावर आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या - विठ्ठल मणियार

Friendship Day: निवडणुकीत साहेबांकडून पराभूत झाल्यावर आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या - विठ्ठल मणियार

googlenewsNext

- मी १९५८ मध्ये बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयामध्ये मॅट्रिकनंतर प्रवेश घेतला. त्याच वर्षी बारामती सारख्या छोट्या भागातून साहेब (शरद पवार) यांनी देखील प्रवेश घेतला होता. आम्ही दोघे एकाच वर्गात होतो. वर्ग प्रतिनिधीची निवडणूक होती. मी पुण्याचा शालेय जीवनात खेळात आघाडीवर होतो. त्यामुळे सर्वांना परिचित देखील होतो. त्यामुळे आपणच विजयी होऊ, याची मला खात्री होती. त्यावेळी साहेब आणि माझ्यात निवडणूक झाली. मी विजयी होणार या आत्मविश्वासात होतो. तर साहेब विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्याशी संवाद साधत प्रचार करत होते. जेव्हा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा साहेब ८० टक्के मत मिळवत विजयी झाले होते. पराभवाने मी काहीसा नाराज झालो होतो. साहेब माझ्याकडे आले आणि म्हणाले, विठ्ठल निवडणूक तर झाली; पण आपल्याला एकत्र काम करायचे आहे. तेव्हापासून आमच्या मैत्रीच्या तारा जुळल्या, त्याला आता ६५ वर्ष होत आली. निवडणुकीतील पराभवाने मला साहेबांसारखा मित्र मिळाला.

साहेबांच्या नेतृत्वगुणाचे झलक त्यांच्या महाविद्यालयीन जीवनात दिसत होती. चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांनी पुढाकार घेत पुण्यात विद्यार्थ्यांचा मोर्चा काढला. तब्बल सात ते आठ हजार विद्यार्थी त्यांनी गोळा केले होते. आमच्या महाविद्यालयातच नाही तर इतर महाविद्यालयात देखील पवार पॅनल उभे राहिले. मी देखील या पॅनलमधून निवडणुका लढल्या. साहेब पुढे आमदार झाले, मुख्यमंत्री झाले. त्यांचा कामाचा आवाका, माणसं जोडणं, वेळ आणि शिस्त पाळण्याची त्यांच्या सवयी अनेक गोष्टी शिकवून गेल्या.

शरदरावांना ‘साहेब’ म्हणू लागलो...

साहेबांना मी शरदराव म्हणून संबोधित असे. ते मुख्यमंत्री झाले तेव्हा मी त्यांना साहेब म्हणू लागलो. तेव्हा ते म्हणाले अरे हे काय? मी उत्तर दिले. तुम्ही मित्र असला तरी आता मुख्यमंत्री आहात. मुख्यमंत्र्यांना नावाने आवाज कसा देणार मी? तुम्हाला नावाने आवाज दिलेला चालेल मात्र लोक काय म्हणतील? त्यांनी नावाने आवाज देण्याविषयी आग्रह केला. मात्र मी साहेब म्हणण्यावर कायम राहिलो. शेवटी ते म्हणाले ठीक आहे. मात्र, मग मी पण तुला विठ्ठलशेठ म्हणणार.

‘ते’ मैत्रीचे दिवस पुन्हा अनुभवतो

आमच्या मैत्रीला ५० वर्षे झालीत तेव्हा सर्व मित्रांनी सहपरिवार दरवर्षी दोन दिवस तरी एकत्र भेटायचे असे ठरले. सर्व मित्र सहपरिवार आम्ही कोकण नाहीतर इतर ठिकाणी जातो. तेथे बाहेरचे जग विसरून मैत्रीच्या जुन्या दिवसांत पुन्हा हरवून जातो आणि पुन्हा दोन दिवसांनंतर पुन्हा आपापल्या जगात परततो.

साहेबांनी पराभव केल्याने नाव इतिहासात

निवडणुकीत पराभव झाला की तो उमेदवार आयुष्यभर नाराज होतो. पण मला माझ्या पराभवाने साहेबांसारखा मित्र मिळाला. मागे वळून पाहताना वाटेत साहेब कोणतीही निवडणूक हरले नाही. त्यांनी पहिली निवडणूक माझ्या विरोधात जिंकली. त्या अर्थाने माझे नाव इतिहासात कोरले गेले.
                                                                                                                                    (शब्दांकन : रोशन मोरे)

Web Title: After losing to sharad pawar in the elections our friendship strings were tied Vitthal Maniyar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.