दुर्दैवी घटना! मामा-मामीनंतर भाचीवरची काळाचा घाला; गाडीवर झाड कोसळून झाला होता अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 12:16 PM2022-04-23T12:16:06+5:302022-04-23T12:16:39+5:30
उपचार सुरू असताना रात्री दोनच्या सुमारास मृत्यू
नीरा :पुरंदर तालुक्यात काल शुक्रवारी झालेल्या वादळ वाऱ्यात पिंपळे येथे झाड अंगावर कोसळून नवविवाहित जोडप्याचा मृत्यु झाला होता. यामध्ये त्यांची सात वर्षाची भाची गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री दोनच्या सुमारास तिचाही मृत्यू झाला आहे.
काल (दि. २२ एप्रिल) सायंकाळी पुरंदर तालुक्यात पाऊस व वादळ वारा सुरु झाला होता. यावेळी परिंचे येथील रेनुकेश गुणशेखर जाधव (वय २९ वर्ष) व त्याची पत्नी सारिका रेनुकेश जाधव (वय २३ वर्ष) त्याच बरोबर त्यांची भाची ईश्वरी संदेश देशमुख हे सासवडहून यात्रेनिमित्त परिंचेकडे मोटार सायकलवर जात होते. साधारण सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांची भाची (बहिणीची मुलगी) गंभीर जखमी झाली होती.
बेशुद्ध अवस्थेत असल्याने ईश्वरी हिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. मात्र आज पहाटे दोनच्या सुमारास या मुलीचा ही मृत्यू झाल्याची माहिती सामोर येत आहे. या घटनेमुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे तीन जीवांचा अंत :
वृद्ध माता पिता झाले पोरके पुरंदर तालुक्यातील बांधकाम विभाग रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेबाबत अत्यंत दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात यापूर्वी सुद्धा अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. रस्त्याच्याकडेला असलेल्या धोकादायक झाडांचा वेळोवेळी सर्वे करून त्यावर उपाय योजना करायला हव्यात. मात्र अर्धवट जळलेली झाडे व पूर्ण वाळलेली झाडे अनेक ठिकाणी यमदूत म्हणून आज ही उभी आहेत. जळालेली किंवा वाळलेली झाडे काढली तर बांधकाम विभागाच्या कारवाईला लोकांना सामोरे जावे लागते. त्यामुळे लोकही त्याकडे दुर्लक्ष करतात. आता तरी बांधकाम विभागाने रस्ता सुरक्षा बाबत आढावा घेऊन आणखी दुर्घटना होण्या अगोदरच उपाय योजना करायला हव्यात.