मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात थंडीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 01:06 AM2017-10-25T01:06:10+5:302017-10-25T01:06:14+5:30
पुणे : मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर, किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांमधील किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी घट दिसून आली आहे.
पुणे : मॉन्सूनने राज्यातून एक्झिट घेतल्यानंतर, किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून, उत्तर महाराष्ट्रातील काही शहरांमधील किमान तापमानात सरासरीपेक्षा मोठी घट दिसून आली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नाशिक येथे १३.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.
गोव्यासह राज्यातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले. हवेतील आद्रतेच प्रमाण कमी होण्याबरोबरच उत्तरेकडून येणा-या वा-यांचा जोर वाढू लागला आहे. त्याचा परिणाम नाशिक, मालेगाव, अहमदनगर येथील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमध्ये मंगळवारी किमान तापमान १३.४ अंश सेल्सिअस होते. ते सरासरीपेक्षा ३ अंशाने कमी आहे. त्यापाठोपाठ अहमदनगर येथे १३़६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. ते सरासरीपेक्षा ४.१ अंश सेल्सिअसने कमी आहे. उस्मानाबाद येथेही १४़९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. उत्तराखंड, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण कर्नाटकातील काही ठिकाणचे किमान तापमान सरासरीपेक्षा कमी झाले आहे, तर मध्य महाराष्ट्र, पश्चिम राजस्थानमधील तुरळक ठिकाणाच्या तापमानात घट झाली आहे़
>राज्यातील प्रमुख शहरांमधील किमान तापमान
(अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १८़४, अहमदनगर १३़६, जळगाव १८़४, कोल्हापूर २१़४, महाबळेश्वर१६़६, मालेगाव १५़५, नाशिक १३़४, सांगली १९़६, सातारा १९़२, सोलापूर १७़६, मुंबई २४़५, अलिबाग २२़५, पणजी २४़६, डहाणु २२़५, उस्मानाबाद १४़९, औरंगाबाद १९, परभणी १६़९, नांदेड १९, बीड १७़२, अकोला १७़८, अमरावती १७़४, बुलढाणा १९़२, ब्रम्हपुरी १८़३, चंद्रपूर १९़३, नागपूर १९, वाशिम १७, वर्धा १७़७, यवतमाळ १५़८़