मुंबईपाठोपाठ पुण्यातही बांगलादेशी घुसखोर सर्च ऑपरेशन; पोलिसांसह मनसे कार्यकर्ते सरसावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 09:55 AM2020-02-22T09:55:18+5:302020-02-22T12:23:32+5:30
सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्याची मोहीम सुरु होती.
पुणे - बांगलादेशी आणि पाकिस्तानी हटाव या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्चानंतर मनसे कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांची शोध मोहीम सुरु केली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील धनकवडी परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी ही मोहीम हाती घेतली.
शहरातील धनकवडी भागातील बांगलादेशी लोकांना शोधण्यासाठी मनसे कार्यकर्ते सरसावले, त्यांच्यासह पोलीसही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी काहींना कागदपत्रांची विचारणा केली त्यातील काही व्यक्तींनी मात्र ते बांगलादेशी नसून बिहारी असल्याचे सांगितले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण तयार झाल्याचं दिसून आलं.
सातारा रस्त्यावरील धनकवडी भागातील इमारतींमध्ये फिरून घुसखोर बांगलादेशी शोधण्याची मोहीम सुरु होती. त्यावेळी घटनास्थळी सहकारनगर पोलिसही हजर होते. सुमारे 50 मनसे कार्यकर्ते परिसरात फिरून घरांमध्ये कागदपत्रांची मागणी करत होते. जर एखाद्याकडे कागदपत्रे नसतील तर त्यांना त्यांच्या देशात पुन्हा पाठवण्याची मागणी मनसेने केली.
काही दिवसांपूर्वी ठाणे, बोरिवली भागात मनसेच्या कार्यकर्त्यांनी बांगलादेशी घुसखोरांना शोधण्याची मोहीम केली होती. ठाण्यातील किंगकाँगनगर येथे राहणाऱ्या तीन बांगलादेशी कुटुंबाना पकडून मनसेने पोलिसांच्या ताब्यात दिले होते. स्थानिकांकडून याची माहिती मिळताच मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत सदर ठिकाणी पोहोचले. त्यानंतर येथे राहणाऱ्यांकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडे ओळखपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड असल्याची माहिती समोर आली. मात्र त्यांच्याकडे बांगलादेशी पासपोर्ट आढळून आल्याची माहिती अविनाश जाधव यांनी दिली.
तर मनसेच्या मोर्चानंतर अनैतिक मानवी वाहतूक, पालघर दहशतवाद विरोधी पथक आणि अर्नाळा पोलिसांनी संयुक्त कारवाई करून अर्नाळा, कळंब, राजोडी परिसरातून सापळा रचून बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई केली होती. पकडलेल्या बांगलादेशींमध्ये १० महिला १२ पुरुष व एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. सर्व बांगलादेशी हे बेकायदेशीरपणे राहून भंगार आणि मोलमजुरीचे काम करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून २३ बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.
पाहा व्हिडिओ-