मॉन्सूनच्या दीड महिन्यानंतरही अर्धा भारत पावसाच्या प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 07:58 AM2019-07-17T07:58:58+5:302019-07-17T08:00:05+5:30
मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़
विवेक भुसे
पुणे : मॉन्सूनच्या आगमनाची संपूर्ण देशभरातून चातकासारखी वाट पाहिली जाते, त्या देवभूमीकडे पावसाने पाठ फिरविली आहे. दीड महिना सरल्यानंतरही देशातील निम्म्या भुभागावर पाऊस कमी झाला आहे़. ७१ जिल्ह्यांमध्ये पाऊस अत्यंत कमी पडला असल्याने तेथे दुष्काळाचे सावट आताच दिसू लागले आहे़ देशातील २८० जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.
मॉन्सूनचे आगमन यंदा उशीर झाल्याने जून महिन्यात सर्वत्र पाऊस कमी झाला होता़ पण, जुलैचा अर्धा महिना सरला तरी काही भाग वगळता देशभरात पावसाचे प्रमाण सर्वत्र कमी आहे़ १५ जुलैपर्यंत मॉन्सून संपूर्ण भारत व्यापतो़ यंदा उशीरा येऊनही मॉन्सूनने राजस्थान, पंजाबचा काही भाग सोडला तर संपूर्ण देश व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले तरी पावसाचे प्रमाण मात्र कमी आहे़
सध्या मॉन्सून ईशान्यकडील राज्यांमध्ये सक्रीय आहे़ १ जून ते १५ जुलैपर्यंत हवामान विभागाचे ३६ विभागापैकी केवळ २ विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ त्याचे एकूण क्षेत्र हे देशाच्या केवळ ५ टक्के इतके आहे़ सरासरीपेक्षा १९ अधिक ते १९ टक्के कमी पाऊस १५ विभागात पडला असून त्यात देशातील ४४ टक्के भुभागाचा समावेश होतो़ तर १९ हवामान विभागात (-५९ ते -२० टक्के) पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे़ त्यात देशातील ५१ टक्के भुभाग येतो़.
मॉन्सूनचे आगमन सर्वप्रथम केरळ राज्यात होते़ यंदा मात्र केरळमधील १४ जिल्ह्यांपैकी १३ जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडला असून एक जिल्ह्यामध्ये अत्यंत कमी पाऊस झाला आहे़ केरळमध्ये १५ जुलैपर्यंत सर्वसाधारण १ हजार मिमी पाऊस पडतो़ .यंदा मात्र जवळपास निम्माच पाऊस आतापर्यंत झाला़ झारखंडमधील २४ जिल्ह्यांपैकी २० जिल्ह्यांमध्ये कमी तर १ जिल्ह्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे़. आंध्र प्रदेशातील १३ पैकी १० जिल्हे, तेलंगणातील ३१ पैकी २३ जिल्ह्यात कमी पाऊस आहे़. एका बाजूला पंजाबातील जोरदार पाऊस असताना दिल्लीत आतापर्यंत केवळ ९ टक्के पाऊस झाला आहे़. त्याच्या शेजारील हरियानामधील २१ जिल्ह्यांपैकी १४ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला असून ४ जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदविला गेला आहे़. तेलंगणा हा मराठवाड्याप्रमाणेच पर्जन्य छायेच्या प्रदेशात मोडणारा भुभाग़ तेथील २१ जिल्ह्यांपैकी २३ जिल्ह्यांमध्ये ५९ ते २० टक्के कमी पाऊस पडला असून २ जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून कमी पाऊस झाला आहे़
एका बाजूला मॉन्सूनचे उशीरा झालेले आगमन व अरबी समुद्र व पश्चिम बंगालच्या उपसागरात आतापर्यंत केवळ एकदाच कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले़ या आठवड्यात पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता नाही़.