दीड महिन्यानंतर आरोपी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2016 01:30 AM2016-03-12T01:30:24+5:302016-03-12T01:30:24+5:30
पार्किंग केलेली दुचाकी काढताना एकाला सहज दुचाकीचा धक्का लागला, या किरकोळ कारणावरून त्याच्यासह इतर साथीदारांनी लोखंडी कोयत्याने खुनी हल्ला केला
सासवड : पार्किंग केलेली दुचाकी काढताना एकाला सहज दुचाकीचा धक्का लागला, या किरकोळ कारणावरून त्याच्यासह इतर साथीदारांनी लोखंडी कोयत्याने खुनी हल्ला केला. हल्ला केल्यानंतर एक आरोपी वगळता इतर सर्व आरोपी फरार झाले होते.
त्यातील आणखी तीन आरोपी जवळपास दीड महिन्यांच्या कालावधीनंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. सासवड न्यायालयाने त्यांना १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेश रोहिदास ताठेले (रा. गराडे, बोरमाळवस्ती, ता. पुरंदर) याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
अक्षय उत्तम जगदाळे (वय २२), तुकाराम सखाराम बडधे (वय १९) आणि आदित्य शांताराम जाधव (वय २३) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विनोद ऊर्फ रॉबर्ट गणपत बडधे (वय २५, रा. कोडीत बुद्रुक) या आरोपीस पोलिसांनी घटना घडल्यानंतर लगेच अटक केली होती. तो सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात आहे. योगेश विलास जाधव (वय २४, रा. कोडीत ) आणि शुभम ऊर्फ गुड्डू अंकुश सणस (रा. मेदनकरवाडी, चाकण) हे दोघे फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)