ऑक्सिजन अभावी एकाचा बळी गेल्यानंतर, प्रशासनाला आली जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:11 AM2021-04-21T04:11:59+5:302021-04-21T04:11:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील शेवाळवाडी येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका कोविड रुग्णाचा बळी गेल्यानंतर, प्रशासनाला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील शेवाळवाडी येथील एका खासगी हाॅस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी एका कोविड रुग्णाचा बळी गेल्यानंतर, प्रशासनाला जाग आली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी तातडीने बैठक घेऊन जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादन वितरण आणि पुरवठा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांची मंगळवारी नियुक्ती केली. या अधिकाऱ्यांना ऑक्सिजन उत्पादक कंपन्या नेमून दिले असून, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
गेल्या एक-दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. याचा मंगळवारी गंभीर परिणाम झाला व एका रुग्णाचा मृत्यू झाला. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मंगळावरी हे आदेश जारी केले. उपजिल्हाधिकारी अविनाश हदगल आणि अस्मिता मोरे यांच्याकडे टायो निप्पॉन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, लिंडे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि बेल्लारी स्टील या तीन कंपन्यांचे जबाबदारी देण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी उत्तम पाटील आणि तहसीलदार अनिल प्रसाद चव्हाण यांच्याकडे आयनॉक्स एअर प्रोडक्स लिमिटेड आणि एअर लिक्विड प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी दिली आहे.
या कंपन्यांमधून उत्पादित होणारा मेडिकल ऑक्सिजन त्याचे कॅलेंडर वाटप यावर नियंत्रण ठेवतानाच टँकर सगळे पोहोचले किंवा कसे, रुग्णालयांना ऑक्सिजनचे वाटप झाले किंवा कसे याची खात्री केली जाईल. लिक्विड मेडिकल ऑक्सिजन उत्पादक आणि त्यांचे रिफिलिंग यावर देखील नियंत्रण असेल असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले.
ऑक्सिजन पुरवठा संदर्भात ऑक्सिजन वितरक आणि रीफिलर्स यांच्यात समन्वय साधण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये नियंत्रण कक्ष आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, उपजिल्हाधिकारी सुप्रिया करमरकर आणि दोन तहसीलदारांसह पाच जणांची नियुक्ती केली आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये रीफिलर्स आणि डिस्ट्रीब्युटर आहेत ऑक्सिजनचा वापर करणाऱ्या सर्व शासकीय-निमशासकीय ग्रामीण आणि शहरी रुग्णालयातील उपलब्ध ऑक्सिजन बेड त्यांना आवश्यक असणारे ऑक्सिजनचा पुरवठा याची दैनंदिन माहिती नियंत्रण पक्षात असेल दर दोन तासांनी वरिष्ठ कार्यालयात यांनी याबद्दलची माहिती सादर करावी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत आणि अविरत राहण्यासाठी हे आदेश अपवादात्मक परिस्थितीमध्ये जारी करण्यात आले आहेत.