पंढरीच्या भेटीनंतर माऊलींच्या पालखीचा पुणे जिल्हयात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 08:35 PM2018-08-02T20:35:53+5:302018-08-02T20:45:49+5:30
पांडुरंगाच्या दर्शनानंतर आज गुरुवारी संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यात प्रवेश केला.
नीरा : आषाढी वारीतील एकादशीच्या पांडुरंगाच्या दर्शनानंतर आज गुरुवारी संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्याने परतीच्या प्रवासात पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. परतीच्या प्रवासातही माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे कालचा मुक्काम होता. आज (गुरुवारी) सकाळी ९ वाजता पालखी सोहळा नीरा नदीकिनारी आला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातील पालखीतून माऊलींच्या पादुका सोहळाप्रमुख डॉ. अजित कुलकर्णी यांनी सोहळामालक राजाभाऊ आरफळकर यांच्याकडे स्नानासाठी दिल्या. आरफळकर, दिनकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘माऊली-माऊली’च्या जयघोषात प्रसिद्ध दत्तघाटावर माऊलींच्या पादुकांना स्नान घातले. स्नान सुरू असताना सोहळ्यासोबत आलेले पुरुष विणेकरी व तुळस घेतलेल्या महिलांनी रथाच्या पुढे व मागे दोन रांगा केल्या होत्या. पादुका पुन्हा रथाकडे आल्यावर प्रथम रथापुढील व नंतर रथामागील विणेकऱ्यांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन देण्यात आले. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. परतीच्या प्रवासातील हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यानंतर माऊलींच्या सोहळ्याने पुणे जिल्ह्यातील नीरा शहरात प्रवेश केला.
छत्रपती शिवाजी चौकात नीरेच्या सरपंच दिव्या पवार, सदस्य अनिल चव्हाण, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष किरण जेधे यांनी स्वागत केले. अहिल्याबाई होळकर चौकातून नीरेतील युवकांनी रथातील पालखी खांद्यावर घेऊन येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ठेवली. या वेळी नीरेसह परिसरातील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी रांगा लावून दर्शन घेतले. दुपारी अडीच वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याने वाल्हे गावाकडे मुक्कामासाठी मार्गक्रमण केले.
०००