पंडित नेहरूंच्या पावलावर नरेंद्र मोदींचे पाऊल; ठरतील पुणे मनपामध्ये येणारे दुसरे पंतप्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 12:34 PM2022-03-03T12:34:00+5:302022-03-03T12:56:46+5:30
महापालिकेमध्ये येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ...
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm naredra modi pune tour) रविवारी (६ मार्च) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी महापालिकेमध्ये (Chhatrapati Shivaji Maharaj statue in pmc) येत आहेत. पुणे महापालिकेमध्ये येणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत. यापूर्वी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (pandit jawaharlal nehru) महापालिकेच्या सभागृहात आले होते. पानशेत पुराची पाहणी करण्यासाठी आलेल्या नेहरूंनी महापालिकेला भेट दिली होती.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार म्हणाले, 'रोहिदास किराड महापौर असताना १९६१ साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महापालिकेला भेट दिली होती. महापालिकेच्या सभागृहातील फोटोही उपलब्ध आहे. यामध्ये नेहरू यांच्यासह तत्कालीन महापौर रोहिदास किराड, त्यांच्या पत्नी, तसेच राज्यपाल श्रीप्रकाश आदी मान्यवर व्यक्ती दिसत आहेत.
त्यापर्वी पंडिंत नेहरू १९५५-५६ साली पुण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने त्यांना जेवणाचे आमंत्रण दिले जावे, असा प्रस्ताव तत्कालीन महापौर रामभाऊ तेलंग यांनी ठेवला होता.
समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी त्यास विरोध केला. त्यावेळी विद्यापीठाच्या एका सभागृहात पंडितजींची जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अधिवेशनासाठी १९६० रोजी नेहरू पुण्यात आले होते, अशी आठवणही पवार यांनी सांगितली.