दमदार पावसानंतर विठुरायाच्या भेटीची लागली आस
By admin | Published: June 29, 2015 06:27 AM2015-06-29T06:27:12+5:302015-06-29T06:27:12+5:30
बेभरवशाच्या निसर्गाने या वर्षी कृपा केली अन् आभाळाच्या ओंझळीतून पावसाचे भरभरून दान दिले आहे. त्यामुळे सर्वत्र पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली असून, शेतकरी आनंदित आहेत.
पिंपरी : बेभरवशाच्या निसर्गाने या वर्षी कृपा केली अन् आभाळाच्या ओंझळीतून पावसाचे भरभरून दान दिले आहे. त्यामुळे सर्वत्र पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली असून, शेतकरी आनंदित आहेत. विठुरायाची झालेली कृपा म्हणून पेरणीनंतर निश्चिंत झाल्यावर लाखो शेतकऱ्यांनी पंढरीला जाण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी आषाढी वारीमध्ये वारकऱ्यांची संख्या ३० टक्क्यांहून अधिकने वाढणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
मात्र, या वर्षी पुणे परिसरासह सर्वत्रच अपेक्षेपेक्षा चांगला पाऊस झाला आहे. मावळ तालुक्यात
आताच जून महिन्याच्या पावसाची सरासरी ओलांडली गेली आहे. येथे ४०० मि.मी.पेक्षाही अधिक पाऊस झाला आहे. पुणे परिसरातही २०० ते २५० मि.मी. पाऊस बरसला आहे. इतकेच नाही, तर हा पाऊस सर्वत्र पडला आहे.
परिणामी, या सर्वच गावांमध्ये जमिनीमध्ये पुरेसा ओलावा झाला आहे. यातून शेतकरी समाधानी झाले असून, २० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. भातरोपांची चांगली उगवण झाली असून, जोमात वाढही होत आहे. बाकीच्या शेतकऱ्यांचीही कडधान्ये, गळीत धान्यांच्या
पेरणीची लगबग सुरू आहे. काही शेतकऱ्यांना शेतामध्ये पेरणीयोग्य वाफसा होण्याची प्रतीक्षा आहे. वाफसा होताच पेरणी करून या
वर्षी वारीत हमखास जाणार असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
(प्रतिनिधी)
> देहू येथून प्रस्थान ठेवणाऱ्या संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यात व आळंदी येथून निघणाऱ्या संत ज्ञानेश्वरमहाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये राज्यातील व राज्याबाहेरील अनेक पालख्या सामील होतात. येथून सर्व पालख्यांचे पंढरीकडे प्रस्थान होते. आषाढी वारी करणाऱ्यांमध्ये शेतकरी वर्गाचे प्रमाण सर्वाधिक असते. मात्र, मागील वर्षी पावसाने बराच काळ दडी मारली होती. शेतांमधील ढेकळंही फुटली नव्हती. परिणामी, पेरणी शक्य नसल्याने दुसरा आधार नसणाऱ्या शेतकऱ्यांना वारीला जाणे शक्य झाले नव्हते.
> पालख्या पंढरपूरजवळ पोहोचेपर्यंतही बहुतांश भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नव्हता. पालखी सोहळा पंढरपुरात दाखल होण्याच्या सुमारासच पुणे, पिंपरी -चिंचवडसह संपूर्ण राज्यात दमदार पाऊस झाला होता. झालेल्या पावसानंतर पेरणी व शेतीची सर्व कामे उरकून अनेक शेतकरी अखेरच्या टप्प्यात पालखी सोहळ्यामध्ये सामील झाले होते. काही जणांनी वाहनांमधून थेट पंढरपुरात पोहोचून विठुरायाचे दर्शन घेत वारी चुकविली नाही. पण, त्यामुळे पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचे प्रमाण मागील वर्षी तुलनेने कमी राहिले होते.
मागील वर्षी पाऊसच झाला नव्हता. आज पेरणी होईल, उद्या पेरणी होईल, याची वाट पाहण्याची वेळ आल्याने अनेक जणांना सुरुवातीपासून वारीत सहभागी होता आले नव्हते. मात्र, या वर्षी पांडुरंगाची कृपा झाली अन् सगळीकडे चांगला पाऊस झाला आहे. गावागावांतील शेतकरी कामे उरकून घेत आहेत. वारीपर्यंत सर्व कामे मार्गी लावून पांडुरंगाच्या भेटीची आस घेऊन मोठ्या प्रमाणात शेतकरी या वर्षी येतील.- हभप विकासमहाराज गिरवले, गिरवली, ता. जुन्नर, पुणे
दर वर्षी नित्यनेमाने वारी करणारे कधीही वारी चुकवत नाही.
अनेक जण शेतीची कामे उरकल्यावर वारीत सहभागी होतात. मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे पायी वारी करणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. पण, या वेळी चांगला पाऊस झाला आहे. त्यातच अधिक महिना आल्याने अशा
स्थितीत पेरण्या उरकून वारीमध्ये जादा वारकरी सहभागी होतील, असा आजवरचा अनुभव आहे. - हभप प्रीतममहाराज मोरे, देहू