सरावानंतर आता विद्यापीठाची प्रत्यक्ष ‘परीक्षा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:12 AM2021-04-09T04:12:26+5:302021-04-09T04:12:26+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १० एप्रिलपासून प्रथम सत्रची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे १० एप्रिलपासून प्रथम सत्रची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी सध्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करण्याची संधी देण्यात आली आहे. परंतु, सरावानंतर आता विद्यार्थ्यांच नाही तर विद्यापीठाला सुद्धा प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांमधील साडेपाच लाखाहून अधिक विद्यार्थी प्रथम सत्रची परीक्षा देणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाने आवश्यक तयारी केली आहे. परंतु, येत्या १० एप्रिलपासून सुरु होणाऱ्या परीक्षा या विद्यापीठाच्या एसपीपीयू एज्युटेक फाउंडेशन या कंपनीच्या माध्यमातूनच घेतल्या जाणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची या कंपनीची पहिलीच वेळ आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेत झालेल्या गोंधळाची पार्श्वभूमी लक्षात घेता कंपनीसमोर चांगल्या पद्धतीने परीक्षा घेण्याचे मोठे आव्हान आहे.
परीक्षा देण्यासाठी कोणत्या तांत्रिक बाबींची पूर्तता करावी लागते. हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु, गेल्या चार दिवसात हजारो विद्यार्थ्यांनी मॉक टेस्ट दिली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऐनवेळी परिक्षेला सामोरे जाणा-या विद्यार्थ्यांना अडचणी येऊ शकतात. अशा विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी विद्यापीठाच्या कंपनीची दमछाक होऊ शकते, असे तज्ञांकडून सांगितले जात आहे. मात्र, विद्यार्थ्यांची परीक्षेसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कंपनीने ७० कर्मचा-यांची नियुक्ती केली आहे.
गुरुवारी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे १ लाख ६० हजार विद्यार्थी देणार होतो. परंतु, केवळ १ लाख ३२ हजार ६११ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली. शुक्रवारी काही विद्यार्थी सराव परीक्षा देणार आहेत. त्यानंतर दुस-या दिवशी प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात होणार आहे.
------------------
किती विद्यार्थी देणार परीक्षा
विज्ञान पदवी : ८८ हजार ८६५
विज्ञान पदव्युत्तर पदवी : १८ हजार २३५
अभियांत्रिकी पदवी : १ लाख ६० हजार
अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी : २,९१६
वाणिज्य पदवी : १ लाख ४० हजार ८१०
वाणिज्य पदव्युत्तर पदवी : १३ हजार १८
कला पदवी : ६८ हजार ६७२
कला पदव्युत्तर पदवी : १२ हजार ६९८
फार्मसी पदवी : १९ हजार ४५८
फार्मसी पदव्युत्तर पदवी : १ लाख ४२३
विधी पदवी : १८१
विधी पदव्युत्तर पदवी : ७५७
मॅनेजमेंट पदवी : ९६६
मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी : ३३ हजार ५५७