रेड अलर्टनंतर मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी, रविवारी बहुतांश भागांत पावसाची विश्रांती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:09 PM2021-06-13T20:09:36+5:302021-06-13T20:09:59+5:30

सोमवारी पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता

After the red alert, Mumbai, Konkan received less rain, with most parts resting on Sunday | रेड अलर्टनंतर मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी, रविवारी बहुतांश भागांत पावसाची विश्रांती

रेड अलर्टनंतर मुंबई, कोकणात पावसाचा जोर कमी, रविवारी बहुतांश भागांत पावसाची विश्रांती

googlenewsNext
ठळक मुद्देमॉन्सूनने रविवारी आणखी वाटचाल करत पंजाबातील अंबाला, अमृतसर, लडाखपर्यंत मजल मारली आहे

पुणे: मुंबईत ९ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील तीन दिवस हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट जाहीर केला. त्यानंतर रविवारी त्यात बदल करून येलो अलर्ट करण्यात आला. मात्र, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार मुंबई, कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हवामान विभागाने उद्या सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत रेड अलर्ट दिला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील येलो अलर्ट मागे घेतला आहे.

रविवारी दिवसभरात मुंबई ७, सांताक्रूझ ०.८, अलिबाग १०, रत्नागिरी १४, पणजी ३, महाबळेश्वर २, चंद्रपूर ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या जवळपासही कोठे पाऊस पडल्याचे वृत्त नाही.

रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी १५०, संगमेश्वर, देवरुख १३०, कानकोण १२०, माणगाव १०, कणकवली, मंडणगड, माथेरान, केपे, राजापूर, सांगे, सावंतवाडी ९०, हर्णे, लांजा ८० मिमी पावसाची नोंद झाली होती. याशिवाय अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यातील सेलू १०, बीड ९०, परतूर ८०, कैज, निलंगा ७०, जिंतूर, मंजलगाव, मंथा ५० मिमी पावसाची नोंद झाली असून, अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. विदर्भातील पावसाचा जोर कमी झाला असला तरी सर्वदूर हलका पाऊस नोंदविला गेला आहे. घाटमाथ्यावरील धारावी १४०, लोणावळा ८९, अम्बोणे, ताम्हिणी ६०, कोयना, वळवण ५० मिमी पाऊस झाला होता.

सोमवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिंगोली, नांदेड, भंडारा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

मॉन्सूनची पंजाब, लडाखपर्यंत मजल

मॉन्सूनने रविवारी आणखी वाटचाल करत पंजाबातील अंबाला, अमृतसर, लडाखपर्यंत मजल मारली आहे. येत्या ४८ तासात दिल्ली, हरियाना, उत्तरप्रदेश, मध्य प्रदेशातील बहुतांश भागात मॉन्सूनचे आगमन होण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण आहे. लडाखमध्ये मॉन्सून २५ जून तर काश्मीरमध्ये ३० जूनला पोहचतो. यंदा मात्र, आजच त्याने हिमाचल प्रदेश, गिलगीट प्रवेश केला आहे. अरबी समुद्राच्या शाखेची वाटचाल मात्र गेल्या ४ दिवसात खूपच धीमी झाली आहे. आज मॉन्सून दिव, सुरत, नंदुरबार, भोपाळ, नॉगाँग, हमीरपूर, बाराबंकी, बरेली, सहारनपूर, अंबाला आणि अमृतसर इथपर्यंत सीमारेषा आहे. 

Web Title: After the red alert, Mumbai, Konkan received less rain, with most parts resting on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.