घटस्फोट देण्यास नकार दिल्याने कौटुंबिक न्यायालयातच पत्नीचा बुक्की मारून पाडला दात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 06:59 PM2021-11-30T18:59:00+5:302021-11-30T18:59:17+5:30
दोघे घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर समुपदेशनासाठी दोघेही कौटुंबिक न्यायालयात आले होते
पुणे : घटस्फोट देण्यास नकार दिल्याने कौटुंबिक न्यायालयातच पतीने पत्नीचा बुक्की मारून दात पाडला. याप्रकरणी पतीविरूद्ध शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन विकास पवार (वय 34 लोहगाव रोड, विमानतळ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ही घटना शिवाजीनगच्या कौटुंबिक न्यायालयातील दुस-या मजल्यावरील समुपदेशन केंद्राच्या बाहेर दि, 27 नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी सोलापूर येथे राहाणा-या पत्नीने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे पती-पत्नी असून, ते दोघेही विभक्त राहात आहेत. घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर समुपदेशनासाठी दोघेही कौटुंबिक न्यायालयात आले होते. यावेळी समुपदेशन केंद्रात पतीने पत्नीला घटस्फोट देण्याची विनंती केली. मात्र फिर्यादीने घटस्फोट देण्यास नकार दिला. पत्नीने नकार दिल्याने रागाच्या भरात आरोपीने फिर्यादीच्या तोंडावर जोरदार बुक्की मारली आणि फिर्यादीचा एक दात पाडला. खालचा अर्धा दात पाडून जखमी केल्याने पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने पुढील तपास करीत आहेत.