ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात आलेली 'ती' व्यक्ती ईडीशी संबंधित कागदपत्रे न घेताच गेली निघून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 06:09 PM2021-01-05T18:09:42+5:302021-01-05T18:14:38+5:30
मी काही ईडीचा अधिकृत कर्मचारी नाही. मला साहेबांनी सांगितले, म्हणून कागदपत्रे घेण्यासाठी आलो....
पुणे : माजी मंत्री आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याशी संबंधित भोसरी येथील जमीन प्रकरणाची कागदपत्रे घेण्यासाठी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) एक व्यक्ती ॲड. असीम सरोदे यांच्या कार्यालयात आली होती. परंतु, तेथे मीडियाला पाहून राकेश नाव सांगणारी व्यक्ती कागदपत्रे न घेताच निघून गेली.
याबाबत ॲड. सरोदे यांनी सांगितले की, ईडीचे अधिकारी राजेश कुमार यांच्याशी आपले अगोदर बोलणे झाले होते. त्याप्रमाणे कागदपत्रे घेण्यासाठी आम्ही अधिकार्यांना पाठवतो. पण येथे आलेले राकेश हे पत्रकार, कॅमेरे पाहिल्यावर म्हणाले, मी काही ईडीचा अधिकृत कर्मचारी नाही. मला साहेबांनी सांगितले, म्हणून कागदपत्रे घेण्यासाठी आलो. तुम्ही मीडियाला कशी परवानगी दिली. त्यावर ॲड. सरोदे यांनी पारदर्शकतेसाठी मिडिया आवश्यक असल्याचे सांगितले. तेव्हा व्यक्ती कागदपत्रे न घेताच निघून गेली.
या संपूर्ण प्रकरणाविषयी व त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्राविषयी ॲड. सरोदे यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी व मुलगी मंदाकिनी खडसे यांच्या नावावर वेगवेगळ्या बनावट कंपन्यांकडून (शेल कंपन्या) रक्कमा जमा करण्यात आल्या आहेत. हा एक प्रकारे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार आहे. त्यातून मनी लाँडिंगचा प्रकार असू शकतो. याबाबत अंजली दमानिया यांनी कंपनी लॉ च्या कार्यालयाच्या वेबसाईटवरुन या कंपन्यांचे पत्ते शोधून काढले. त्यासाठी त्या पार पश्चिम बंगालमध्ये गेल्या होत्या. तेव्हा या कंपनी ज्या पत्त्यावर रजिस्टर आहेत. तेथे या कंपन्याच नसून ती छोटी मोठी दुकाने आहेत. त्याची अंजली दमानिया यांनी २०१६ मध्ये तक्रार दिली होती. तसेच एकनाथ खडसे हे महसुल मंत्री असताना भोसरी येथील जमिनीबाबत त्यांनी जे नोटिग दिले होते. त्यात नंतर खाडाखोड केली. संबंधित विभागाकडून ही जमीन खरेदीस हरकत नाही, असा जो पत्रव्यवहार आहे, त्याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत.
खडसे यांची लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करुन ही केस बंद करण्याचा क्लोजर रिर्पेाट न्यायालयात दाखल केला होता. त्याला अंजली दमानिया यांच्या वतीने आपण आक्षेप अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आमचे म्हणणे मान्य केले असून हा खटला अद्याप प्रलंबित आहे. आता खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ईडीने चौकशी सुरु केली आहे. त्यासाठी त्यांनी तुमच्याकडील कागदपत्रे द्या अशी आपल्याला विनंती केली होती, असे ॲड. सरोदे यांनी सांगितले.