Lokmat Impact: शिवनेरीनंतर आता सिंहगडावरही प्लास्टिक बंदी !
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 02:43 PM2024-03-30T14:43:51+5:302024-03-30T14:45:01+5:30
गडकिल्ल्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. सिंहगड तर पुणेकरांचा खास किल्ला आहे. शनिवार-रविवार तिथे प्रचंड गर्दी होते...
पुणे : जुन्नर वन विभागाने किल्ले शिवनेरीवर प्लास्टिक बंदी लागू केली. त्यानंतर आता किल्ले सिंहगडावरही ५ जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार आहे. तसे नियोजनही वन विभागाने सुरू केले आहे. दरम्यान, ‘लोकमत’ने किल्ले शिवनेरीवर बंदी झाली, सिंहगडावर कधी? असे वृत्त दिले होते. त्यानंतर वन विभागाने सिंहगडावरही लास्टिक बंदी करण्यासाठी पावले उचलली आहेत.
गडकिल्ल्यांवर पर्यटक मोठ्या प्रमाणावर फिरायला जातात. सिंहगड तर पुणेकरांचा खास किल्ला आहे. शनिवार-रविवार तिथे प्रचंड गर्दी होते. तसेच, प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्याही पाहायला मिळतात. हा कचरा इतरत्र पडल्याने गडाचे पावित्र्य धोक्यात येते. त्यावर आता वन विभाग योग्य पावले उचलण्याचे नियोजन करत आहे. शिवनेरी किल्ल्यावर पहिल्यांदा प्लास्टिक बंदी लागू झाली. तिथे गेल्या आठवड्यापासून त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. तिथे हा निर्णय लागू होण्यापूर्वी गडावर शुद्ध पाण्याची सोय केली हाेती. त्यामुळे त्यांना निर्णय घेतल्यानंतर कसलाही त्रास झाला नाही.
आता सिंहगडावरही पुरेशा शुद्ध पाण्याची सोय करणे अपेक्षित आहे. त्यानंतरच असा निर्णय घेणे योग्य ठरणार आहे. त्याबाबतीत वन विभागाने नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे पुणेकरांनीही आता गडावर जाताना सोबत प्लास्टिकची बाटली न ठेवता स्टीलची ठेवावी किंवा गडावरील पाण्यावर आपली तहान भागवावी. कारण पायथ्यावरच ५ जूनपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय लागू होणार आहे. तेव्हा प्लास्टिकच्या बाटल्या त्या ठिकाणी देऊन मगच गडावर जावे लागणार आहे. हा अतिशय स्तुत्य निर्णय असल्याची भावना गडप्रेमींकडून व्यक्त होत आहे.
किल्ले सिंहगडावर आम्ही ५ जूनपासून प्लास्टिक बंदी करण्याचे नियोजन करत आहोत. सध्या गडावर स्वच्छता मोहीम सुरू आहे. ती आम्ही नेहमीच करत असतो; पण आता ५ जून रोजी पर्यावरण दिन आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीचे नियोजन करण्यात येत आहे.
- प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन विभाग, पुणे