...त्यानंतर कोथरूड भाजपात नाराजी राहणार नाही; शहराध्यक्ष धीरज घाटे संबंधितांशी संवाद साधणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 09:58 AM2023-08-16T09:58:25+5:302023-08-16T09:58:51+5:30

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा कोथरूड भाजप पदाधिकाऱ्यांच्या नाराजीवर लक्ष घालण्याचा आदेश

...After that there will be no resentment in Kothrud BJP City President Dheeraj Ghate will interact with the concerned | ...त्यानंतर कोथरूड भाजपात नाराजी राहणार नाही; शहराध्यक्ष धीरज घाटे संबंधितांशी संवाद साधणार

...त्यानंतर कोथरूड भाजपात नाराजी राहणार नाही; शहराध्यक्ष धीरज घाटे संबंधितांशी संवाद साधणार

googlenewsNext

पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपूल उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर कोथरूडभाजपात जाहीरपणे नाराजी नाट्य व्यक्त झाले, मात्र आता काहीही वाद राहणार नाहीत. प्रदेशाध्यक्षांच्या आदेशावरून शहराध्यक्ष धीरज घाटे लवकरच सर्व संबंधितांशी संवाद साधणार आहेत.

कोथरूडच्या सिटिंग आमदार असूनही उमेदवारीत डावलले गेले. त्यानंतरही मागील ४ वर्षे माजी आमदार डॉ. मेधा कुलकर्णी शांत होत्या. ऐन उड्डाणपुलाच्या कार्यक्रमाआधी एक दिवस त्यांनी समाजमाध्यमातून जाहीरपणे कोथरूडमधील पदाधिकाऱ्यांवर नाव न घेता तोफ डागली. पुलाच्या कामाचा आपण पाठपुरावा करूनही त्याची दखल घेतली गेली नाही, असे म्हणत त्यांनी आपले अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यानंतर त्या कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांंनी डॉ. कुलकर्णी यांना कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत स्थान दिले. शिवाय कार्यक्रमानंतर गडकरी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या निवासस्थानीही गेले. त्यामुळे नाराज झालेल्या कोथरूडमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी कोथरूड विधानसभेचे भाजप अध्यक्ष पुनीत जोशी यांच्या माध्यमातून डॉ. कुलकर्णी यांनी पक्षशिस्त सोडून वागल्याची टीका केली. उद्घाटनाच्या होर्डिंग्जवर त्यांचे छायाचित्र असल्याचा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर अशा पद्धतीने जाहीरपणे पक्षातील गोष्ट चव्हाट्यावर आणणे अयोग्य आहे, यामुळे लहान-लहान गोष्टींवरून कार्यकर्ते असेच वागतील, अशी भीतीही व्यक्त केली. त्यावरून नाराजीनाट्य वाढतच जाईल याचा अंदाज आल्याने पक्षनेतृत्वानेच याची दखल घेतली आहे.

पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्र्यांसमोर असे होणे योग्य नाही. डॉ. कुलकर्णी जाहीरपणे बोलल्या असतील, पण त्याधी त्यांना डावलणे, पक्षाचे निरोप न देणे, पक्षाच्या मोठ्या कार्यक्रमांचे जाहीर पास न देणे हेही अयोग्यच असल्याचे, मत पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केले असल्याचे समजते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची मर्जी सांभाळण्यासाठी कोणी परस्पर असे करत असेल तर त्यांना समज द्यायला हवी, असेही मत त्यांनी व्यक्त केल्याची माहिती मिळाली.

लक्ष घालण्याचा आदेश 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यात लक्ष घालण्याचा आदेश दिला आहे. मी लवकरच यातील सर्व संबंधितांशी बोलणार आहे. त्यानंतर कोथरूड भाजपात कसलीही नाराजी किंवा मतभेद राहणार नाहीत. - धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप

Web Title: ...After that there will be no resentment in Kothrud BJP City President Dheeraj Ghate will interact with the concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.