'मला प्रेमाने दिलेली हाक मी कधीच विसरणार नाही'; देवेंद्र फडणवीसांनी लक्ष्मण जगताप यांना वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 02:07 PM2023-01-03T14:07:00+5:302023-01-03T14:09:20+5:30
लक्ष्मण जगताप यांच्या या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते, भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि विद्यमान आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. लक्ष्मण जगताप यांच्या या निधनानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पिंपरी-चिंचवडचे भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दांत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात दिलेले योगदान कायम लक्षात राहील. मतदारसंघाचा विकास हाच ध्यास घेऊन त्यांनी काम केले. वाढत्या शहरीकरणात वंचित व उपेक्षित घटकांच्या हिताला बाधा न पोहचता विकास झाला पाहिजे यासाठी ते आग्रही होते. आपल्या आजारपणातही त्यांनी राज्यसभेसाठी मतदान करून राज्याचा आवाज संसदेत वाढला पाहिजे, यासाठी आग्रह धरला. मी त्यांना मतदानात भाग घेऊ नका, आपली तब्येत सांभाळा असे सांगूनही त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा दाखवली होती. विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार, असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. या दुःखद प्रसंगी आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
विधानभवनात पीपीई कीट घालून त्यांचे मतदानाला येणे आणि त्यावेळी अत्यंत प्रेमाने मला दिलेली हाक मी कधीच विसरू शकणार नाही. मध्यंतरी प्रकृती सुधारत असताना ते आपल्यात पुन्हा परतणार असा ठाम विश्वास होता. पण आज ही वाईट बातमी आली. मन सुन्न आहे.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2023
ॐ शांति 🙏 pic.twitter.com/cOfZ8WacB1
दरम्यान, २००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले. नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली.