इर्शाळगड येथील घटनेनंतर प्रशासन सतर्क; मावळातील दरडप्रवण धोकादायक स्थळांची पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 01:02 PM2023-07-21T13:02:04+5:302023-07-21T13:02:43+5:30
मावळचे तहसीलदार व शासकीय अधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील धोकादायक असलेल्या आठ गावांची पाहणी गुरुवारी केली...
वडगाव मावळ (पुणे) : रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शळगड येथे दरड कोसळून काही जणांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर शासन खडबडून जागे झाले. ज्या ठिकाणी धोकादायक दृश्य असेल त्या ठिकाणी तत्काळ पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशा सूचना सरकारने दिल्याने मावळचे तहसीलदार व शासकीय अधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यातील धोकादायक असलेल्या आठ गावांची पाहणी गुरुवारी केली. त्यासोबतच नागरिकांना सूचना केल्या.
तालुक्यातील ताजे, लोहगड, बोरज तुंग, माळवाडी, माऊ गबाळेवस्ती, माऊ मोरमाची वाडी, भुशी, आदी दरडप्रवण धोकादायक ठिकाणी तहसीलदार विक्रम देशमुख, बांधकाम खात्याचे उपअभियंता धनराज पाटील, शाखा अभियंता श्रीनिवास पांचाळ, विस्तार अधिकारी बाळासाहेब वायकर, माणिक साबळे यासह अन्य शासकीय अधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार विक्रम देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, मावळातील काही ठिकाणे धोकादायक आहेत. त्या ठिकाणच्या नागरिकांना सूचना देण्यात आल्या. त्यासोबतच काही परिस्थिती जाणवली, तर काही कुटुंबांना शाळांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासकीय कंट्रोल रूम करण्यात आला आहे. तालुक्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. एखादी आपत्तीची घटना घडल्यास सरपंच, पोलिस पाटील किंवा तलाठी सर्कल यांनी त्वरित कंट्रोल रूमला कळवायचे आहे. तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना पावसाळा संपेपर्यंत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पर्यटकांनी खबरदारी घ्यावी : तहसीलदार
तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. धरणे, नद्यांच्या पाण्यासाठ्यात वाढ झाली आहे. तालुक्यात अनेक पर्यटक येतात, पाण्यात उतरतात. पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यासोबतच दरडप्रवण धोकादायक असलेल्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन तहसीलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे.