"तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो", माथेफिरूंना पोलिसांचा सज्जड इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 03:12 PM2023-06-29T15:12:20+5:302023-06-29T15:30:04+5:30
सदाशिव पेठेतील घटनेनंतर पुणे पोलीस खडबडून जागे; बीट मार्शल, दामिनी पथके वाढवणार, पोलीस आयुक्तांचा निर्णय
पुणे : प्रेमसंबंधात ब्रेकअप केल्याच्या कारणावरून तरुणीवर भर दिवसा एका माथेफिरूने कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण शहर पोलिस दल खडबडून जागे झाले. महाविद्यालयीन विद्यार्थिनी, महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकांची गस्त वाढविण्यात येणार असून, बीट मार्शलची संख्या वाढवली जाणार असल्याचे पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले. तर आता पुण्यात कोयता घेऊन फिरणाऱ्यांचे प्रमाणही वाढत चालले आहे. अशा माथेफिरूंना तुम्ही हातात कोयता घेऊन तर दाखवा मग आम्ही बघतो असा सज्जड इशारा पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी दिला आहे.
तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर संपूर्ण राज्यभरातून त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तरुणांनी या तरुणीचा जीव वाचवून तिला पेरुगेट पोलिस चौकीत आणल्यानंतर तेथे कोणीही पोलिस नव्हते. तेथे ड्युटीवर असलेले दोन्ही पोलिस कर्मचारी नव्हते. घटनास्थळी पोलिसांना पोहोचण्यास उशीर झाल्याने पोलिसांवर टीका होऊ लागली.
या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी सांगितले की, दामिनी पथकात सध्या १५ दामिनी पथके आहेत. त्यांची संख्या २५ करण्यात आली आहे. एका दुचाकीवर दोन महिला कर्मचारी गस्त घालणार आहेत. शाळा, महाविद्यालये, महत्त्वाचे चौक, गर्दीच्या परिसरात गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच सकाळ आणि सायंकाळी अशा दोन सत्रामध्ये १०० बीट मार्शल तैनात करण्यात येणार आहेत.
घटनेत त्या माथेफिरूने बॅगेमधून कोयता आणला होता. त्यामुळे पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान अशा प्रकारच्या बॅगा, संशयित व्यक्तींची देखील तपासणी करण्यात येणार आहे. पोलिस चौकीमध्ये पोलिस नसल्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. एरवी रात्रीच्या वेळी बंद असलेल्या पोलिस चौक्या मंगळवारी रात्री उघड्या असल्याचे दिसून आले.
तरुणाईच्या समुपदेशनावर भर..
प्रेमप्रकरणावरून तरुणींना टार्गेट करण्याच्या घटना घडत आहे. त्यामुळे पोलिसांनी याबाबत महाविद्यालयीन स्तरावर तरुणाईचे समुपदेशन करण्याचे ठरविले आहे.
शाळा, महाविद्यालयात तक्रार बॉक्स
अनेकदा घाबरून तरुणी बोलण्यास अथवा तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालयात पूर्वीप्रमाणे तक्रार पेटी ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्तांनी दिल्या आहेत. प्रत्येक दोन दिवसाला या पेटीची दखल घेतली जाणार आहे.
तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार
शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार असून, यासाठी दामिनी पथक, बीट मार्शल वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शाळा, महाविद्यालये येथे तक्रारींसाठी ड्रॉपबॉक्स बसविण्यात येणार आहेत. वेळोवेळी स्थानिक पोलिसांकडून याची तपासणी होईल. - रितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर.