Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 02:33 PM2022-06-10T14:33:47+5:302022-06-10T14:35:01+5:30
गुरुवारी १३१ कोरोनाबाधितांचे निदान...
-प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : तिसऱ्या लाटेमध्ये १० मार्च रोजी शहरात ११६ इतक्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यानंतर तब्बल तीन महिन्यांनी शहरातील रुग्णसंख्येने १०० चा आकडा ओलांडला आहे. गुरुवारी १३१ कोरोनाबाधितांचे निदान झाले. त्यापैकी १७ रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,
२ रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या सुमारे ५६० इतकी आहे. जानेवारी महिन्यात तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. तिसऱ्या लाटेमध्ये पुण्यात कोरोनाबाधितांचा आजवरचा उच्चांक गाठला गेला. २० जानेवारी २०२२ रोजी आजवरच्या एका दिवसातील सर्वाधिक ८,३०१ इतक्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस रुग्णसंख्या कमी होऊ लागली. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रुग्णसंख्या १०० पेक्षा खाली आली. साधारणपणे १५ मार्चनंतर दररोज १५-२० कोरोनाबाधितांची नोंद होत होती.
तिसरी लाट ओसरल्यावर शासनातर्फे सर्व निर्बंध हटविण्यात आले. मार्च महिन्यात कानपूर आयआयटीने मॅथेमॅटिकल मॉडेलद्वारे जून-जुलैमध्ये चौथ्या लाटेची शक्यता वर्तविली होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात चौथ्या लाटेला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला. ही लाट ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालेल, असे कानपूर आयआयटी मॉडेलनुसार सांगण्यात आले आहे. मात्र, वैद्यकतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, तिसऱ्या लाटेप्रमाणे चौथी लाटही एक ते दीड महिन्यांमध्ये ओसरेल.
तिसऱ्या लाटेनंतर लसीकरणाच्या प्रक्रियेत कमालीची शिथिलता आली आहे. बूस्टर डोस न घेणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे. चौथ्या लाटेचा सामना करताना लसीकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. लसीकरण पूर्ण केलेल्यांना लागण होण्याचा धोका कमी असून, संसर्ग झालाच तरी तो सौम्य स्वरूपाचा असेल, असे सध्याचे निरीक्षण आहे. पुन्हा लॉकडाऊनची शक्यता नसली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक वर्तन करावे, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
दोन-तीन दिवसापासून रुग्णसंख्येने १०० चा टप्पा ओलांडला आहे. ही चौथ्या लाटेची सुरुवात मानण्यात येत असून, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत रुग्णसंख्या १००० पर्यंत पोहोचू शकते. मात्र, सध्या कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. रुग्णसंख्या वाढली तरी सुमारे ९८ टक्के रुग्ण घरीच बरे होऊ शकतील. दीड ते दोन टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. लसीकरण पूर्ण करून घेतल्यास चौथ्या लाटेवर मात करता येऊ शकते. सध्या चाचण्यांची संख्या आणि केंद्रे टप्प्प्याटप्प्याने वाढविली जात आहेत.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
रुग्णसंख्या
१ जून ६८
२ जून ६५
३ जून ७२
४ जून ६८
५ जून ६३
६ जून ४६
७ जून ८२
८ जून १३२
९ जून १३१